सोनईत कडकडीत बंद; तीन आरोपीना अटक; पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा
शनीशिंगणापुर : नेवासा तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील चर्च मध्ये दोन पाद्रींकडून माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची घटना घडली आहे. दहा वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार घडल्याने सोनईसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १५ फेब्रुवारी दुपारी घडली. या प्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल करण्यात आली असून पाद्री उत्तम बळवंत वैरागर, पाद्री संजय वैरागर (दोघे रा.सोनई )व पाद्री सुनिल गंगावणे (रा.अहमदनगर) या तीघांना अटक करण्यात आली आहे.
तीनही आरोपीं विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात कलम ३७६ व ३५४ व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका गटाने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तर दुसऱ्या गटाने दाखल झालेला गुन्हा चुकीचा असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, शिंगणापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, सुरज मेढे हे परिस्थितीवर नियत्रंण ठेवून आहेत.
न्यायालयाने तीनही आरोपींना २०फेब्रुवारी पर्यत पोलिस कोठडी दिल्याची माहिती तपास अधिकारी तथा सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी दिली. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.