मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
कोल्हापुर : शिवसेनेसाठी अनेक शिवसैनिकांनी घरावर तुळसीपत्र ठेवले आणि हे आले पीठावर आयत्या रेगोट्या मारायला, पण त्या सुद्धा नीट मारता आल्या नाहीत. बाळासाहेबांचा वारसा सांगण्यास तोंडात नारा, मनगटात मेहनत असावी लागते. शिवसेनेचे हिंदूत्व व्यापक आहे. आता हिंदूहृदयसम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते? काँग्रेसला लांब ठेवायला बाळासाहेब बोलले होते, पण यांनी तर काँग्रेसला मांडीवर घेवून बसले. शिवसेना वाचवण्यासाठी हे धाडस आम्ही केले. शिवसैनिकांचे खच्चीकरण होवू लागल्यानेआम्ही हे पाऊल उचलले असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
कोल्हापुरात शिवसेनेच्या महाधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चांगलाच समाचार घेतला.
ठाकरे यांच्या इनोसंन्ट चेहऱ्यामागे अनेक भूमिका आहेत. त्यांनी शिवसैनिक, जनता, भाजप आणि पंतप्रधान मोदींना फसवले. एकदा नाही तुम्ही दोन वेळा त्यांनी जनतेला फसवले आहे. यावरूनच किती मुखवट्यांआड तुम्ही लपणार आहात? बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होते. वेगळे होताना छातीवर दगड ठेवावा लागला. सत्तेचा मोह त्यांना २००४ पासूनच होता. याला अर्जुन खोतकर यांच्यासह अनेकजण साक्षी आहेत, असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सोडून जाणारे नेते का गेले हे त्यांनी एकदा तपासून पहावे. हे सगळे नेतेसोबत असते तर शिवसेनेची सत्ता अनेकवेळा आली असती. नारायण राणे व राज ठाकरे यांचा तुम्हाला काय त्रास होता? दोन चार टकल्यांना सोबत घेवून पक्ष पक्ष मोठा होत नाही. हे एकमेकांना झुंजवत होते.पुत्र प्रेमापोटी ध्रुतराष्ट्रालाही मागे पाडले. त्यामुळे वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा पाहावा, असा सल्ला त्यांनी ठाकरे यांना दिला.
जेव्हा मी गडचिरोलीत काम करत होतो, तेव्हा पोलिस बोलले, आपल्याला मायनिंगचे काम करता येणार नाही. मी त्यांना बोललो, नक्षलवाद मोठे की सरकार मोठे? कारखाना चालू केला. १० हजार लोकांना रोजगार मिळाला. आणखी प्रोजेक्ट घेतले असून हजारो रोजगार मिळतील, श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
तुम्ही कोरोना काळात काय केले? कोरोना काळात तुम्ही फेसबुकवर खेळायचा, आम्ही मात्र ‘फेस टू फेस’ खेळतो. त्यामुळे माझ्या अर्थी ‘सीएम’ म्हणजे कॉमन मॅन. मी कधीच कोणाला घाबरत नाही. दाऊद आला, शकील आला, तरी हा एकनाथ शिंदे घाबरणारा नाही. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक तयार करा. तिकीट न मिळाल्यास नाराज होऊ नका. अनेक निवडणुका असतात. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पैशातून लोकांचे प्रेम मिळत नाही. कार्यकर्ताच नेत्याचे ब्रँडिंग करू शकतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना म्हटले आहे.