Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीRepublic Day 2024 : महाराष्ट्राला देशात क्रमांक एक राज्य बनवण्याची शपथ घेऊयात!

Republic Day 2024 : महाराष्ट्राला देशात क्रमांक एक राज्य बनवण्याची शपथ घेऊयात!

प्रजासत्ताक दिनी काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुंबई : आज देशभरात स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन (Republic day) साजरा केला जात आहे. यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात येते. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण पार पडले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ९ वर्षांत केलेल्या कामाचं कौतुक केलं. त्याशिवाय राम मंदिरावरही भाष्य केले. तसेच देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान महत्वांचं असल्याचं सांगितलं व महाराष्ट्राला देशात क्रमांक एक राज्य बनवण्याची शपथ घेण्याचं आवाहनही केलं.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना सुद्धा माझं वंदन. महाराष्ट्र हे या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. हे स्थान टिकवण्यासाठी मागील दीड वर्षांच्या काळात महायुती सरकारने आपलं कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं, हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रनं आपली छाप टाकण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असं आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राचं बहुमूल्य योगदान असेल

भारत हा संपूर्ण विश्वात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतोय. याचं निर्विवाद श्रेय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना द्यायलाच पाहिजे. गेल्या नऊ वर्षात देशाने आपली मोहर जगावर उमटवली आहे. नुकतीच अयोध्येत श्री राम मंदिरात राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली, हे मंदिर उद्याच्या नव्या भारताच्या प्रगतीचे प्रतीक बनणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. महाराष्ट्र देखील या प्रगतीत आपले बहुमूल्य योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. हे मी ठामपणे सांगू इच्छितो.

महाराष्ट्रात विकासाचे एक नव पर्व आले. कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा यामध्ये आपण मोठी झेप घेत आहोत. आपल्या समृद्ध साधन सामग्री आणि पर्यावरणाला सुद्धा आपल्याला जपायचे आहे. महाराष्ट्राची ओळख एक शांतताप्रिय, सामाजिक सलोखा असणारं राज्य म्हणून आहे. आपल्यालाही ओळख वाढवायची आहे. आजच्या पवित्र दिवशी आपण भारतीय प्रजासत्ताकासाठी एकात्मतेची भावना वाढीस लावण्याची आणि महाराष्ट्राला देशात क्रमांक एक राज्य बनवण्याची शपथ घेऊयात. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद, जय महाराष्ट्र!, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -