अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अयोध्यानगरी सजलेली होती. देशाचेच नव्हे, तर साऱ्या जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या नेत्रदीपक सोहळ्याने देशभरात उत्साहाच्या लाटा उसळल्या. भगवे वातावरण निर्माण झाले; परंतु त्याचबरोबर त्याला अाध्यात्मिक आणि धार्मिकतेची जोड मिळाली; परंतु अयोध्येतील लखलखाटामुळे झालेली प्रचंड जळजळ उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या पक्षाच्या शिबिरात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. २२ आणि २३ जानेवारीला नाशिक येथे म्हणे महाअधिवेशन घेण्यात आले. सोबत राहिलेल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना बूस्टर डोस देण्याचा प्रयत्न केला असला तरी तोच विषय, तीच भाषणे पाहायला मिळाली. या शिबिरातून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न झाला; परंतु या शिल्लक सेनेच्या संजय राऊतांसह अन्य नेत्यांनी आपल्या भाषणात सर्व भडास पंतप्रधान मोदी यांच्यावर काढण्याचा प्रयत्न केला. तसा उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाचा रोखही पंतप्रधान मोदी यांच्याकडेच होता.
राम मंदिर व्हावे ही समस्त हिंदूंची इच्छा होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक हे कारसेवक बनले ही गोष्ट कोणी नाकारत नाही. जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हयात असते, तर भव्यदिव्य राम मंदिर झाल्याचा आनंद त्यांना अधिक झाला असता. मात्र वारसाहक्काने शिवसेना पक्षावर अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता पोटशूळ का? असा प्रश्न उपस्थित होतो. तुमचे हिंदुत्व हे आमच्या हिंदुत्वापेक्षा कसे वेगळे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या शिबिरात त्यांनी नवी घोषणा केली. भाजापमुक्त हिंदुत्व करायचे आहे म्हणे. एवढेच नव्हे, तर मी २०१८ साली अयोध्येत राम मंदिरात गेलो आणि वर्षभरात सर्वोच्च न्यायालयाचा राम मंदिराच्या बाजूने निकाल आला, असा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला, त्यात यांची साधी साक्ष नसताना हे कसे बुवा शक्य झाले. किती हास्यास्पद प्रकार आहे हा. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचे औचित्य साधून काळाराम मंदिरातील दर्शन व पूजेचा कार्यक्रम करणे म्हणजे राजकीय शोबाजी नव्हे का? ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी अवस्था उबाठा सेनेची झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर जळफळाट करण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वत:चा पक्ष आणि चिन्ह यांना टिकवता आला नाही. तो निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. ४० आमदार, १३ खासदार यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी ठाकरे यांची साथ सोडली. एवढ्या मोठ्या संख्येने लोक पक्षातून बाहेर का पडले, याचे आत्मचिंतन करण्यापेक्षा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी उबाठा सेनेतील नेते सोडत नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले. त्यांनी विकासकामांचे लोकार्पण केले; परंतु उद्धव ठाकरे यांच्यावर कधीही वैयक्तिक टीका केली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमीच आदर केला; परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीही नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदीनामाचा गजर केला. आपल्या चुका दुरुस्त करण्याऐवजी ठाकरे हे मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत आहे, ही काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याचा विचार महाराष्ट्रातील सुजाण जनतेने करण्याची गरज आहे.
५०० वर्षांच्या संघर्षानंतर आलेला हा क्षण लोकांनी जल्लोषात साजरा केला. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते, तर हा क्षण आलाच नसता हे देशातील प्रत्येकाला ठाऊक आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत देशातील नामवंत तारे-तारका गर्दीत उभे राहून एकाच लखलखत्या ताऱ्याला अभिवादन करत होते. तो तारा म्हणजे नरेंद्र मोदी. नाशिकच्या शिबिरात ठाकरे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून आलेले पाहून अनेकांचे मनोरंजन झाले. बाळासाहेबांसारखे दिसण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातून पुन्हा एकदा शेंडी-जानव्याकडे ठाकरेंचा प्रवास सुरू झालेला दिसतो. सलग ११ दिवस कडकडीत उपावास करणारे मोदी कुठे आणि बापाची नक्कल करणारे हे भोगी कुठे? हा प्रश्न जनतेला पडू शकतो. शिवनेरीची माती पवित्र आहे, पण ती माती हाती धरायला सुद्धा पात्रता लागते. म्हणे शिवनेरीची माती घेऊन गेलो म्हणून राम मंदिर पूर्ण झाले. किती खोटारडेपणा हा. मग ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर राजकारण चालविण्याचा प्रयत्न केला, त्या बाळासाहेबांचे मुंबईतील स्मारक महाराष्ट्राची सत्ता अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून हातात असताना का पूर्ण केले नाही? शिवनेरीवरून आणलेली थोडी माती लाटलेल्या महापौर बंगल्यात टाकण्याचा विचार नाही आला का डोक्यात? आपले काहीच नाही. काही निर्माण करता येणार नाही, उभारता येणार नाही. मग आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याशिवाय दुसरा पर्याय कुठे शिल्लक राहतो. पित्याचे स्मारक बनवता आले नाही, त्याने देशात भव्य राम मंदिराच्या निर्मितीचे शिवधनुष्य पेलणाऱ्या मोदींबद्दल का बोलावे…?