Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमराठवाडा दुसऱ्या दिवाळीच्या प्रतीक्षेत

मराठवाडा दुसऱ्या दिवाळीच्या प्रतीक्षेत

मराठवाडा वार्तापत्र : अभयकुमार दांडगे

अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. हा सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ असा झाला. संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण होते. तर मराठवाड्यातही अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. सर्वत्र जल्लोष, मंत्रोच्चार, ढोल- ताशा, भक्तिमय रांगोळी तसेच कारसेवकांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात आले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यानिमित्ताने एक आगळी-वेगळी दिवाळी साजरी झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात साजरी झालेली ही पहिली दिवाळी होय. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुनश्च पंतप्रधानपदी निवड व्हावी, असे साकडे रामभक्तांनी घातले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हॅटट्रिकही लवकरच होईल, हे २२ तारखेच्या मराठवाड्यातील गजबजलेल्या वातावरणातून स्पष्ट झाले. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होऊन पंतप्रधान होतील यामध्ये रामभक्तांना तीळमात्र शंका नाही. मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर मराठवाड्यात दुसरी दिवाळी साजरी होणार आहे, हे मात्र नक्की.

संपूर्ण भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्यात आले. श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त मराठवाड्यातील विविध राम मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे रात्रभर मराठवाड्यातील मंदिर परिसर चमचमत होता. मराठवाड्याला संतांची भूमी म्हटले जाते. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री घृष्णेश्वर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील मंदिर आणि बीड जिल्ह्यातील परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिर. ही तिन्ही मंदिरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. यासह नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे रामलल्ला अयोध्येमध्ये विराजमान झाल्याचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रातील सोहळा लक्षात घेता मराठवाड्यात झालेला अभूतपूर्व सोहळा हा इतिहासात सुवर्णअक्षरात नोंद करण्याजोगा झाला. रविवारी मध्यरात्री १२ वाजता सर्वच ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री २.३० वाजता मंदिरांमध्ये मंत्रोच्चार सुरू झाला. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मराठवाड्यातील ग्रामीण भागात महिलांनी अंगणात सडा टाकून मोठ्या रांगोळ्या काढून अक्षरशः दिवाळी साजरी केली. ग्रामीण भागातील हनुमान मंदिरात संत-महंतांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ठिकठिकाणी महापंगतही पार पडली. ‘मेरे घर राम आये है…’ या गीतावर मराठवाड्यातील लाखो रामभक्तांनी एकच जल्लोष करत थिरकले. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी गेल्या काही दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू होते. सोमवारी झालेल्या मुख्य पूजेसाठी मराठवाड्याच्या बीड तालुक्यातील कळसंबर येथील पंडित गजानन ज्योतकर या २९ वर्षीय तरुणास मुख्य पूजेचा मान मिळाला. त्यामुळे मराठवाड्यात एक वेगळाच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ज्या तरुणास मुख्य पूजेचा मान मिळाला त्यांनी संस्कृत विषयात पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे. त्यानंतर या तरुणाने आळंदी येथे सहा वर्षे आणि धुळे येथे चार वर्षे वेदाचे शिक्षण घेतले. तर गेल्या बारा वर्षांपासून ते वाराणसी येथे द्रविड गुरुजी यांच्याकडे पौरोहित्याचे शिक्षण घेत आहेत. अयोध्येतील पूजा, पौरोहित्याची जबाबदारी गणेश शास्त्री द्रविड गुरुजी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. यामध्ये बीडच्या गजानन ज्योतकर यांना मुख्य पूजेचा मान मिळाला, ही मराठवाडावासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने मराठवाड्यात भक्तीचा महापूर ओसंडला होता.

नांदेड शहरात सर्वत्र भगव्या पताका आणि भगवे झेंडे झळकले. जागोजागी भाजपा नेत्यांकडून कार्यक्रम घेण्यात आले. यामुळे नांदेडचे वातावरण खूप वेगळेच बनले होते. काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला जाण्याचे टाळले. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे नेते अयोध्या येथील कार्यक्रमावर बहिष्कार घालत असतील, तर मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्यावर बहिष्कार घालावा असे वक्तव्य आठवले यांनी केले होते. लोकसभा निवडणूक जवळ असल्याने नांदेडमधील वातावरण पाहून पायाखालची वाळू सरकलेल्या अशोक चव्हाण यांनी रविवारी दुपारी रामभक्तांना शुभेच्छा देणारे फलक शहरात लावले. त्या फलकाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. केवळ नांदेडमध्येच नव्हे; तर संपूर्ण मराठवाड्यात त्या फलकाची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली. अशोक चव्हाण यांनी हे फलक लावत असताना स्वतःचे पद, पक्ष व इतर कोणत्याही बाबीचा उल्लेख केला नाही. महात्मा गांधी यांचे आवडते ‘रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको संन्मती दे भगवान’ या भजनातील ओळी त्या फलकावर प्रदर्शित केल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण हे गैरहजर राहिले होते. त्यानंतर ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा, वावड्या असल्याचा खुलासा स्वतः अशोक चव्हाण यांनी कधीही केला नाही. तर काँग्रेसमध्ये अधिक सक्रिय होऊन त्यांनी त्यांच्या कृतीने उत्तर दिले होते. तरी देखील भाजपा नेत्यांकडून वारंवार ते काँग्रेस सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी आयोध्येतील कार्यक्रमानिमित्त रामभक्तांना शुभेच्छा देणारे बॅनर नांदेडमध्ये झळकविल्याने ते पुन्हा भाजपामध्ये येणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मते पडणार आहेत, हे मात्र या सोहळ्यातून अधोरेखित झाले आहे. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त अकरा दिवस उपवास करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर आधुनिक ‘श्रीमंत योगी’च आहेत, असा गौरव मोदींच्या बाबतीत झाल्याने आता मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील व त्यानंतर मराठवाड्यात पुन्हा एकदा अशीच दुसरी दिवाळी साजरी होईल, हे मात्र निश्चित झाले आहे.

abhaydandage@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -