Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीMahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये पसरतेय रोगराई! गोखले इन्स्टिट्यूटच्या अभ्यासातून समोर आले 'हे' कारण

Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये पसरतेय रोगराई! गोखले इन्स्टिट्यूटच्या अभ्यासातून समोर आले ‘हे’ कारण

रोगराईला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना?

महाबळेश्वर : थंडीच्या मोसमात (Winter season) महाराष्ट्रातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि माथेरान (Matheran) या ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळते. महाबळेश्वर हे कुटुंबासमवेत फिरण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या वेण्णा तलावात (Venna lake)घोड्यांच्या मिसळत असलेल्या विष्ठेमुळे (Horse manure) पर्यटकांमध्ये रोगराई (Disease) पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाबळेश्वरच्या वेण्णा तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या घोड्यांची विष्ठा महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे. ही विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोखले इन्स्टिट्यूटने महाबळेश्वरसंदर्भात केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

कसा करण्यात आला अभ्यास?

रोगराईमागची कारणे शोधण्याचे काम गोखले इन्स्टिट्यूने हाती घेतले. सर्वप्रथम महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या वेण्णा तलावाच्या पाण्यासह इतर सर्व स्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे, घरे, व्यावसायिक आस्थापना व भूजल यांचे सखोल नमुने घेण्यात आले. या सर्व नमुन्यांमध्ये प्रदूषण दिसून आले.

त्यानंतर संशोधकांच्या पथकाने या प्रदूषणाचा उगम शोधण्यास सुरुवात केली. या शोधाअंती घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा व वेण्णा तलावालगत उभ्या असलेल्या घोड्यांची विष्ठाही पाण्यात मिसळली जात असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय महाबळेश्वरमधील सर्व रस्त्यांवर आणि पाण्याच्या पाइपलाइनलगत घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा आढळतो. घोड्यांच्या विष्ठेमध्ये प्रदूषणाव्यतिरिक्त इतर विषाणू आणि जीवाणू असल्याने पाणी दूषित होऊन ते सर्व आजारांना कारणीभूत ठरत असल्याचे सिद्ध झाले.

या रोगराईला आळा घालण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूने काही उपाययोजना सुचवल्या आहेत –

  • वेण्णा तलावापासून घोडे उभे राहण्याची जागा दूर नेणे.
  • व्यापाऱ्यांनी आपले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवावेत.
  • घोड्यांच्या विष्ठेचा वापर करून बायोगॅस आणि वीजनिर्मिती होऊ शकेल.
  • सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवावेत.

या प्रकरणी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गोखले इन्स्टिट्यूटच्या टीमने सुचविलेल्या उपाययोजनांनुसार, महाबळेश्वरमध्ये बदल होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पामध्ये यांचे योगदान

‘गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे’च्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएसडी) या संस्थेच्या माध्यमातून ‘आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प’ हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी महाबळेश्वरची निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रा. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांनी या प्रकल्पावर काम केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -