मुंबई : पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी सध्या पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येत आहे. या ब्लॉकमध्ये दररोज लोकलच्या किमान २५६ हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. दररोज एवढ्या प्रमाणात लोकलच्या फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहे. प्रवाशांमध्ये असलेल्या संतापाची दखल घेत पश्चिम रेल्वेने एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर रोजी काही लोकल रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.
एवढ्या प्रमाणात लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्याने लोकल ट्रेनमधून प्रवास करणे जिकरीचे झाले. अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. काही ठिकाणी चेंगराचेंगरी सदृष्य स्थितीदेखील निर्माण झाली होती. अनेकांनी लोकल ट्रेन ऐवजी खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारल्याने रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली.
पश्चिम रेल्वेच्या या ब्लॉकच्या निर्णयावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर पश्चिम रेल्वेने काही लोकलच्या फेऱ्या रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 आणि २ नोव्हेंबर रोजी रद्द असणाऱ्या 316 लोकलपैकी 204 लोकल रद्द करून उर्वरित 112 लोकल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून पश्चिम रेल्वे मार्गावरील 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबपर्यंत या 11 दिवसांत 2500 हून अधिक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी प्रत्येकी 256 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर रविवारी 116 अप आणि 114 डाऊन अशा एकूण 230 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचं काम 7 ऑक्टोबरपासून सुरू झालं असून 26 दिवस रूळजोडणीचं काम सुरू राहणार आहे. 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत रूळ जोडणीचं मुख्य काम सुरू आहे. रूळजोडणीच्या कामासाठी रुळांवरील वाहतूक थांबवणं गरजेचं आहे. मुंबई लोकल सलग काही दिवस बंद ठेवणं शक्य नसल्यानं ब्लॉककाळात काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
नव्या सहाव्या मार्गिकेमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्यांच्या एकूण क्षमतेत 20 टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.