गैरप्रकार उघडकीस येऊ नये म्हणून ‘या’ शाळेत विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार उघड
अहमदनगर : नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मध्यान्ह भोजनातील शालेय पोषण आहारातील खिचडीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर काही सामाजिक संघटना व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना याचा जाब विचारला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी पालकांनी आज शाळेत आंदोलन केले आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सोनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना १९ ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहार वाटप केला. त्यामध्ये अळ्या आढळून आल्या. अळ्या आढळल्याची ही तिसरी वेळ आहे.
घडलेली घटना शाळेबाहेर जाऊ नये म्हणून शिक्षकांनी मुलांच्या हातून आहार हिसकाऊन त्याची विल्हेवाट लावली आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या आरोग्याशी खेळणं ही खूप निंदनीय बाब आहे आणि ही घटना खरी आहे. याची शहानिशा कार्यकर्त्यांनी केली आहे व त्याचे पुरावे देखील आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच ज्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. स्वराज्य संघटना या गावकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे लवकरात लवकर दोषींवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा स्वराज्य संघटना या बाबतीत आक्रमक भूमिका घेईल, असे निवेदन देखील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.