४० कोटींचा निधी मंजुर; पुढील महिन्यात कामाला होणार सुरुवात
ठाणे : ठाणे शहरामध्ये महापालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून येथील विद्यार्थी, तरुण, नागरिक यांच्यासाठी ठाणे शहरातील घोडबंदर रोड येथे वेगवेगळ्या ४ ठिकाणी ऑलम्पिक साईज जलतरण तलाव (स्विमिंग पूल) व त्याचठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. घोडबंदर रोड येथे चार स्विमिंग पूल बांधण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून प्रत्येकी १० कोटी असे ४ स्विमिंग पूल बांधण्यासाठी एकूण ४० कोटी रुपये निधी मंजुरीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.
शहरातील विद्यार्थी, नागरिक यांना पोहण्याची संधी मिळावी यासाठी शहरात आणखी ४ स्विमिंग पूल तयार झाल्यास विद्यार्थी-तरुणांच्या क्रीडागुणांना वाव तर मिळेलच, त्यातून नवीन जलतरणपटू घडतील. तेथेच जिम असल्यास पोहणे व शारीरिक व्यायाम दोन्ही गोष्टी होतील. त्यामुळे सर्व अर्थाने शहराच्या ४ वेगवेगळ्या भागात होणारे हे स्विमिंग पूल नागरिकांच्या आरोग्याच्या फायद्याचे ठरतील. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील महिन्यात स्विमिंग पुलाचे बांधकाम सुरू होईल, असेही आमदार सरनाईक म्हणाले.
ठाणे शहरातील घोडबंदर रोड येथील पोखरण रोड नं. २ वरील कॉसमॉस होरायझन लगत ठा.म.पा.च्या सुविधा भूखंडावर व आनंद नगर येथील सरस्वती शाळेजवळील आरक्षित मैदानाच्या भुखंडावर या दोन ठिकाणी ऑलम्पिक साईज जलतरण तलाव व त्याचठिकाणी जिम बांधली जाणार आहे. तसेच आनंद नगर येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटल शेजारील उद्यानाच्या आरक्षित जागेच्या १५ टक्के जागेवर व वाघबीळ गावाशेजारील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या व महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर अशा एकूण ४ ठिकाणी जलतरण तलाव (स्विमिंग पूल) व त्याचठिकाणी जिम बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी स्वागत कक्ष, चेंजिग रूम, शौचालय, स्टोअर रूम व फिल्ट्रेशन प्लांट बनविण्यात येणार आहे. या प्रत्येकी स्विमिंग पूल व जिमसाठी १० कोटी असा एकूण ४० कोटींचा निधी राज्य सरकारने ’महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास“ या योजने अंतर्गत ठाणे शहरासाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यात प्रत्येक स्विमिंग पूल बांधण्यासाठी ५ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून पुढील महिन्यात कामाला सुरुवात होणार असल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे व आयुक्तांचे आभार मानले आहेत.
ठाणे शहरामध्ये कळवा, कोपरी व वर्तकनगर या भागामध्येच नागरिकांच्या सोयीसाठी ऑलम्पिक साईज जलतरण तलाव व त्याच ठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात आलेले आहेत. ठाणे शहरात सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गरीब असे सर्व समावेशक समाजघटक राहत असून ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटी म्हणून ओळखण्याकडे होत आहे. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी वर्तकनगर येथे आमदार सरनाईक यांच्या प्रयत्नांनी एक स्विमिंग पूल तयार झाला आहे. तो परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांना उपयोगी पडेल. पण शहराच्या इतर भागात नागरिकांना त्यांच्या जवळच आपापल्या भागात सरकारचे स्विमिंग पूल असावेत, अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे.
‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास’ या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. त्यात या प्रकल्प खर्चाचा ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा व २५ टक्के हिस्सा महापालिकेचा राहणार आहे. राज्य सरकारकडून ४ स्विमिंग पूलसाठी एकूण २० कोटी रुपये निधी पहिल्या टप्प्यात ठाणे महापालिकेला मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता स्विमिंग पुलाचे काम सुरु होणार आहे. तर या प्रकल्पासाठी उर्वरित रक्कम पुढील आर्थिक वर्षात महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहरातील घोडबंदर रोड येथे आणखी ४ स्विमिंग पुलाचे काम मार्गी लागले आहे, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.