लखनऊ : ज्ञानवापी मशीद परिसरात एएसआय सर्व्हेक्षणाला अलाहाबाद हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. एएसआय सर्व्हेक्षणाला याआधी हायकोर्टानेच स्थगिती दिली होती.
वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला हाय कोर्टाने कायम ठेवले आहे. यामुळे एएसआयवर लावण्यात आलेली बंधने देखील हटवली आहेत. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर एएसआयने २४ जुलैपासून सर्व्हेक्षणाला सुरवात केली होती. यामुळे मशीद कमिटी सर्वोच्च न्यायालयात गेली होती.
सर्वोच्च न्यायालयाने एएसआय सर्वेक्षण तात्काळ थांबवताना २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकाल देण्याचे आदेश हायकोर्टाला दिले होते. त्यावर सुनावणी होऊन हायकोर्टाने २७ जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता. हायकोर्टाने ३ ऑगस्ट रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. आज हा निर्णय आला आहे. यामुळे आजपासूनच सर्व्हेक्षण सुरु होण्याची शक्यता आहे.
जिल्हा न्यायालयाने एएसआयला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून ४ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने विलंब झाला आहे. ज्ञानवापी कॅम्पसच्या एएसआय सर्वेक्षणाबाबत वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कुमार विश्वेश यांच्या न्यायालयात ४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सर्वेक्षणासंबंधीचा स्टेटस रिपोर्ट एएसआय न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर त्यांना पुढील मुदत दिली जाणार आहे.