Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीOpposition Leader : विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्ष नेते

Opposition Leader : विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्ष नेते

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Opposition Leader) आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली.

त्यानंतर सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी श्री.वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विरोधी पक्षनेते श्री.वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील – विधानसभा अध्यक्ष

सभागृहाला विरोधी पक्षनेते पदाची मोठी परंपरा लाभलेली आहे. या पदावर विराजमान व्यक्तीची जबाबदारी अधिक आहे. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार हे सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य फक्त समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे नाही तर, वेळप्रसंगी काही घडताना जे लोक गप्प राहतात त्यांना ते लक्षात आणून देणे, हे आहे. श्री. वडेट्टीवार ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील. यापूर्वीही सभागृहातील विविध खात्यांच्या मंत्री पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून राजकीय, सामाजिक कार्याचा शुभारंभ त्यांनी केला. वन कामगार, शेतकरी, विद्यार्थी, वनशेती आंदोलने त्यांनी केलेली आहेत. लोकहिताच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे नेते, अशी त्यांची प्रतिमा आहे, असे सांगून कर्तृत्ववान नेत्याला या सभागृहाच्या विरोधीपक्षनेता नियुक्तीबद्दल मी शुभेच्छा देतो, असेही ॲड. नार्वेकर म्हणाले.

लोकशाही सक्षम राहण्यासाठी विरोधी पक्षनेता महत्त्वाचा – मुख्यमंत्री 

विरोधी पक्ष हा लोकशाहीचा आत्मा आहे. लोकशाही सक्षम राहण्यासाठी विरोधी पक्षनेता हे पद महत्त्वाचे आहे. विजय वडेट्टीवार ही जबाबदारी सक्षमतेने सांभाळतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. वडेट्टीवार यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राला विधायक काम करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांची परंपरा आहे. राजकारणातील गैरसमज दूर करणे, राजकारण लोकाभिमुख करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. मतमतांतर, विचारांचे आदानप्रदान झालेच पाहिजे. विकासकामांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एखादी गोष्ट पटली नाही तर जरुर टीका करावी, मात्र चांगल्या गोष्टीचे कौतुकही त्यांनी करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.

आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आंदोलनात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री. वडेट्टीवार यांनी त्यात सक्रीय सहभाग घेतला व त्याचे नेतृत्व केले. याशिवाय, गडचिरोली जिल्हा व्हावा म्हणून त्यांनी सातत्याने आंदोलने केली. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र त्यांनी आजवर कायम पाळले आहे. राज्यातील शेतकरी, दुर्बल घटक, महिला यांना अधिकाधिक सक्षम करायचे आहे. विरोधाला विरोध किंवा राजकीय अभिनिवेष बाजूला ठेऊन महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर नेण्यासाठी विरोधीपक्षनेता म्हणून ते सहकार्य करतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.

जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करतील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सभागृच्या विरोधी पक्षनेतेपदी सक्षम विरोधी पक्षनेत्यांची मांदियाळी पाहायला मिळते. जनसामान्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय करून घेतले आहेत. विजय वडट्टीवार यांची जमिनीशी जोडलेला नेता म्हणून ओळख आहे. जनतेच्या हितासाठी ते व्यापक कार्य करतील, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी जिथे शासनाचे चुकले, तिथे त्यांना धारेवर धरले. अनेक वेळा संपूर्ण सभागृह एकत्र असले पाहिजे, त्यावेळी एकदिलाने त्यांनी अनेक प्रस्ताव मांडले आहेत, ही परंपरा आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा मान सन्मान वाढविण्याकरिता विजय वडेट्टीवार हे काम करतील. ते संवेदनशील नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा सभागृहाला होईल, असा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

विरोधी पक्षनेते जनतेच्या भावना तडफेने मांडतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील जनेतेचे प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्याचे कार्य शासन करतच आहे. मात्र, जनतेच्या भावना सभागृहाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार हे जबाबदारीने व तडफेने पूर्ण करतील, अशा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला

श्री. पवार म्हणाले की, आक्रमक स्वभाव, सामाजिक प्रश्नांची जाण आणि वैचारिक बैठक असणारे विजय वडेट्टीवार आपल्या कर्तव्यात कमी पडणार नाहीत. ते तडफेने आपली जबाबदारी पार पाडतील. शासनाच्या जनहिताच्या निर्णयांना त्यांच्याकडून पाठिंबा देखील मिळेल. विरोधी पक्षनेत्याच्या पदाला मोठी परंपरा आहे. या पदावर काम केलेल्या व्यक्तींनी पुढे राज्यात आणि केंद्रातही मोठमोठ्या पदांवर काम केले आहे. त्यामुळे श्री. वडेट्टीवार यांचे अभिनंदन करतानाच त्यांना शुभेच्छाही देतो. यापूर्वीही त्यांनी ही जबाबदारी काही काळासाठी सांभाळली होती. पुढील काळातही ते चांगले काम करतील आणि जनतेचा विश्वास संपादन करतील, अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली

सर्वसामान्यांसाठी नेहमीच आवाज उठविणार- विजय वडेट्टीवार

आपण मोठ्या संघर्षातून या पदापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण मला आहे. केवळ राजकारणाच्या भावनेतून कोणत्याही प्रश्नाकडे न पाहता त्यातून सामान्य माणसाला न्याय मिळेल, यासाठी कायम कार्यरत राहू. त्यांच्या प्रश्नांसाठी कायम आवाज उठवू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर दिले.

यावेळी ते म्हणाले की, जीवनाच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष पाहिला. त्यानंतर जी वाटचाल झाली, त्यातून सामान्य माणसांचे प्रश्न धसास लावले. कधी सत्ताधारी म्हणून, तर कधी विरोधी पक्षाच्या बाकांवर बसून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम केले. या पदावर असताना ती जबाबदारी अधिक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु, असे यावेळी त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर विधानसभा सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, भास्कर जाधव, कालिदास कोळंबकर, नाना पटोले आदींची भाषणे झाली. सर्वांनी या निवडीबद्दल श्री. वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -