Thursday, April 24, 2025
Homeकोकणरायगडउरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना ६ महिन्यांत भूखंड वाटपाची कार्यवाही पूर्ण करणार -...

उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना ६ महिन्यांत भूखंड वाटपाची कार्यवाही पूर्ण करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : रायगड जिल्ह्यातील उरण येथील प्रकल्पासाठी सिडकोने २८ गावांमधील ४५८४ हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला. यापैकी १३४ हेक्टर जागा प्रकल्पग्रस्तांना देणे आवश्यक होते. १०४३ प्रकल्पग्रस्तांना १०२.९२ हेक्टर जागेचे वाटप करण्यात असून साडेबारा टक्के योजनेतंर्गत ५७५ प्रकल्पग्रस्तांना ३२.४२ हेक्टर जागेचे वाटप होणे बाकी आहे. अशा भूखंड वाटपाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंड वाटपाची कार्यवाही येत्या ६ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

उरण (नवी मुंबई) येथील सिडको प्रकल्पग्रस्त साडेबारा टक्के योजनेंतर्गत भूखंड वाटपाच्या प्रतिक्षेत असल्याबाबत विधान परिषद सदस्य रमेशदादा पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले की, उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेतंर्गत द्यावयाचे भूखंड वाटप हे सदर जागा कांदळवनसाठी सीआरझेडमध्ये प्रस्तावित असल्याने किंवा काही ठिकाणी अतिक्रमणे असल्याने राहिले होते. त्यामुळे पर्याय म्हणून बोकडवीरा, चाणजे, पागोटे, नागाव, रानवड, नवघर या ७ गावांमध्ये सिडको संपादित करणारी ३६४ हेक्टर जागा, तसेच सिडकोच्या ताब्यात असलेली २६.५१ हेक्टर जागा, या दोन्ही पर्यायांचा अवलंब करून येत्या ६ महिन्यांत प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे.

मंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, नवी मुंबईमध्ये 3343 प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यात आला आहे. वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे, वाढीव मोबदलादेखील लवकरात लवकर देण्याची कार्यवाही करण्यात येईल. देण्यात येणा-या मोबदल्याची साडेबारा टक्क्यांची किंमत वाढते, हे देखील शेतक-यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याचा उल्लेख मावेजा म्हणून करण्यात येतो. मावेजा देण्याबाबतचा अहवाल सादर झाला असून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

याबाबत मंत्री श्री. सामंत म्हणाले, साडेबारा टक्के योजनेंतर्गत ठाणे शहरात 3257 लाभार्थ्यांना 171.96 हेक्टर जागा वाटपपैकी 166.07 हेक्टर जागा दिलेली आहे. पनवेलमध्ये 3695 लाभार्थी असून 563.1 हेक्टर जागा वाटपपैकी 553.16 हेक्टर जागेचे वाटप केले आहे.तसेच उरणमध्ये 1618 प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना 135 हेक्टर जागा वाटपपैकी 102 हेक्टर जागा दिलेली आहे. तर 32.42 हेक्टर जागा द्यावयाची आहे. नवीन भूसंपादन करण्यात येणा-या नागाव, रानवड, नवघर, पागोटे, चाणजे, या गावांमधून 324.23 हेक्टर जमिन ही सिडको संपादित करणार. त्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांना समाविष्ट करण्यात येईल.

सिडको प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनींचे डिनोटीफिकेशन करण्याची बाब तपासून पाहीली जाईल. सिडको जी जमिन संपादित करते, त्या जागेचा मोबदला दिला जातो. तसेच कायमस्वरूपी बांधकामे असतील, तर त्याचाही मोबदला दिला जातो, असेही मंत्री उदय सामंत यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या चर्चेमध्ये विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, अनिकेत तटकरे यांनीही सहभाग घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -