
मलेरिया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ
मुंबई : गेल्या दिड महिन्यापासून राज्यभर कोसळणा-या तुफान पावसानंतर आता नागरिकांना विविध संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये आठवडाभरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुप्पट तर मलेरिया रुग्णांची संख्या दीड पटीने वाढली आहे. आठवडाभरात मलेरियाचे ७२१, डेंग्यूचे ५६९ आणि गॅस्ट्रोचे १ हजार ६४९ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. साथीच्या आजारांना थोपवण्यासाठी उपनगरीय रुग्णालयात ५०० बेड्स तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच संध्याकाळी ४ ते ६ ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे.
मुंबईत जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसानं पावसाळी आजारांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईत मलेरीया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्यात वाढ झाली आहे. जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या एकूण १६४९ रुग्णांची नोंद झाली तर मलेरियाचे देखील जुलै महिन्यात ७२१ रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यात देखील मलेरीयाचा प्रादुर्भाव होता. गेल्या महिन्यात ६७६ रुग्णांची नोंद झाली होती. जुलै महिन्यात लेप्टोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. लेप्टोच्या ३७७ रुग्णांची नोंद झाली तर जून महिन्यात लेप्टोचे रुग्ण ९७ होते.
डेंग्यूने देखील जुलै महिन्यात डोकं वर काढलं आहे. जुलै महिन्यात ५७९ रुग्णांची नोंद झाली आहे. तेच डेंग्यूचे जून महिन्यात ३५३ रुग्ण आढळून आले होते. म्हणजे जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळाले. चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत देखील जूनच्या तुलनेत वाढ होताना पाहायला मिळाली आहे. जून महिन्यात चिकगुनियाचे ८ रुग्ण होते तेच जुलै महिन्यात ही संख्या २४ वर पोहोचल्याचं दिसलं. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबई पालिकेकडून लेप्टोसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या होत्या.