छत्रपती संभाजीनगर : अखेर बोर्डाने बारावीच्या उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध लावला असून, या प्रकरणी भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकेत एकाच अक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोघे प्राध्यापक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयात उध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उसारे राहुल भगवानसिंग (रा पिंपळा ता. सोयगाव), मनीषा भागवत शिंदे (रा. धनवट ता.सोयगाव) अशी या आरोपींची नावे आहेत.
सोयगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी रंगनाथ रेवबा आढाव यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा – बारावीच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिका एकाच व्यक्तीने कशा लिहिल्या?
बारावीच्या भौतीकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळून आल्याचे प्रकार समोर आला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणात बोर्डाने एक चौकशी समिती नेमली होती. दरम्यान यावेळी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील या उत्तरपत्रिका असल्याचे समोर आले. पण दुसरे हस्ताक्षर कोणाचे याचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची, मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशी अंती समितीने उसारे राहुल भगवानसिंग आणि मनीषा भागवत शिंदे या दोन्ही अध्यापकांना दोषी ठरविल्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.