पुणे (प्रतिनिधि) : पुणे जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीला शुक्रवारी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वेळेअगोदर बैठकीला पोहचलेले शरद पवार संपूर्ण बैठक पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते परंतु त्यांनी कुठलेही भाष्य केले नाही.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधान भवनात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. बैठकीस विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, आमदार दिलीप वळसे पाटील, दत्तात्रेय भरणे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक हजेरी लावल्याने अनेकांना सुखद धक्का बसला.
पवारांच्या डीपीसीच्या बैठकीतील हजेरीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मी अनेक वर्षे पुण्याचा पालकमंत्री होतो. मात्र, पवारसाहेब प्रथमच डीपीसीच्या बैठकीला आलेले मी पाहिले. ते का आले, ते मलाही माहिती नाही. खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले तर त्या म्हणाल्या की, बैठक कशी चालते, हे बघायला आले असतील. पण, ते बैठकीत शेवटपर्यंत बसून होते. मात्र, त्यांनी फक्त ऐकण्याची भूमिका घेतली. ते बैठकीत जास्त काही बोलले नाहीत. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी मात्र आपापली भूमिका मांडली.