रवी शास्त्री यांचे मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात तीन खेळाडूंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून त्यांना भारतीय संघात संधी मिळावी असा सूर चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. भारताचा माजी प्रशिक्षकही या खेळाडूंच्या कामगिरीने प्रभावित झाला आहे. यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह आणि तिलक वर्मा या युवा खेळाडूंचा दमदार फॉर्म पाहता हे खेळाडू विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठीही दावेदार असल्याचे मत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
यंदाचा आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटूही नव्या खेळाडूंना पाहून प्रभावित झाले आहेत. यंदाच्या हंगामात ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, रिंक सिंह, तिलक वर्मा, नेहाल वधेरा यासारख्या अनेक तरुण खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना आणि सुयश शर्मा यांसारख्या युवा खेळाडूंच्या गोलंदाजीचाही कहर पाहायला मिळाला.