मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला भारत देश हा २०३० पर्यंत जगातील तिसरी आर्थिक शक्ती होण्याचे स्वप्न पाहिले असून त्यासाठी आपला प्रत्येकाचा हातभार असला पाहिजे असे सांगत प्रत्येक नवउद्यमींच्या मागे सिडबी, सूक्ष्म व लघू उद्योग खाते व सीजीटीएमएसई या संस्था उभ्या आहेत. त्याचा उपयोग घेऊन व अथक परिश्रम करून आपण हे नक्कीच करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज वांद्रे येथे सूक्ष्म व लघू उद्योग क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टच्या म्हणजेच सीजीटीएमएसईद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीजीटीएमएसइच्या सुधारित योजनेचे नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर सूक्ष्म व लघू खात्याचे सेक्रेटरी बी. बी. स्वेन, सिडबीचे चेयरमन एस रामम व सूक्ष्म व लघू खात्याचे आयुक्त इशिता त्रिपाठी उपस्थित होत्या. यावेळी नारायण राणे म्हणाले की, बँकांनी नवउद्यमींना फक्त पैसाच पुरवू नये तर त्यासाठी अजून काय काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. नवउद्यमींनी कर्ज घेतल्यानंतर त्या उद्योजकांनी पुढे कोणती प्रगती केली. त्यांनी कोणते उत्पादन घेतले, त्यांची वार्षिक उलाढाल किती आहे हेही बघितले पाहिजे तसेच त्यांनी किती रोजगार निर्माण केला व देशाच्या प्रगतीसाठी किती हातभार लावला हे पाहून त्यांचाही सत्कार केला पाहिजे, अशी भूमिका मांडली.
- नवतरुणांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले की, सध्या आपल्या देशातून आयातीचे प्रमाण निर्यातीपेक्षा खूप वाढले आहे. ज्या दिवशी निर्यात ही आयातीपेक्षा जास्त होईल. त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपण आर्थिक सक्षम होऊ. २०३० पर्यंत आपण तिसऱ्या क्रमांकाची शक्ती होऊ तो दिवस आपल्या सर्वासाठी गर्वाचा दिवस असेल असे त्यांनी सांगितले.
- जर आपल्याला महासत्ता बनायचे असेल तर आपल्या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे व त्यासाठी आपल्याला निरंतर प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला महासत्ता बनण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल यासाठी सिडबी व विविध बँकांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितली.
- बऱ्याच ठिकाणी बँकांकडून कर्ज मागण्यास गेलेल्या उद्योजकाचा अपमान केला जातो. त्यांचे फॉर्म भिरकावले जातात. अशा माझ्याकडे बऱ्याच तक्रारी येत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. पंतप्रधानांची भारत महासत्ता होण्याची इच्छा पूर्ण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्त्यव्य असले पाहिजे व त्यासाठी सर्वांनी हातभार लावावा व बँक अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागावे, असा सल्ला दिला.
- ही नवीन योजना लागण्या पूर्वी नवउद्यमींना आता बँक गॅरंटी २ कोटींची मिळत असते. आता सीजीटीएमएसइद्वारे ती आता ५ कोटींपर्यंत मिळणार आहे. अशा नवी सवलती लागू केल्यामुळे जास्तीत जास्त नवउद्योगी याचा लाभ घेतील.