मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार हे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल बदलण्यात आले आहे. अजित पवार यांचे सोशल मीडिया प्रोफाइल बदलण्यात आले असून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख वगळण्यात आला आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचे सरकार स्थापन केल्यापासून अजित पवार यांच्याबद्दल अधूनमधून चर्चा होत असतात. अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या यायच्या. मात्र, शिखर बँक प्रकरणातून अजित पवार यांचे नाव वगळल्याची बातमी आल्यापासून त्यास जोर आला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन फुटण्याच्या तयारीत आहेत, त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट झाली असून सत्तावाटपाची बोलणीही झाल्याचे बोलले जात आहे.
मात्र अजित पवार यांनी या सर्व बातम्या फेटाळल्या. आजही त्यांनी असे काही नाही, असे सांगितले. मात्र, तितक्यातच त्यांच्या सोशल मीडिया हँडलचे स्क्रीन शॉट सर्वत्र फिरू लागले. अजित पवार यांच्या फेसबुक व ट्विटर प्रोफाइलवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाचा फोटो होता. तो फोटो आता गायब झाला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.