संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली भूमिका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत येत असेल तर शिवसेना बाहेर पडेल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चामुळे शिंदे गटालाही धक्का बसू शकतो. त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवारांबाबत बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. मात्र अजित पवार यांची नाराजी आणि आमची सर्वोच्च न्यायालयातील केसचा काहीही संबंध नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.
यावेळी शिरसाट यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले की, नागपूर येथे आयोजित वज्रमुठ सभेत अजित पवार यांना बोलू दिलं नाही. १० मिनिट बोलू दिलं असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांना बोलू दिलं नाही. तसेच धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांचेही फोन उचलत नव्हते, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.