ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचं खळबळजन वक्तव्य
ठाणे: उद्धव ठाकरे हे आनंद दिघे साहेबांना भेटायल्यावर आतमध्ये काय झाले माहित नाही पण त्यानंतर अर्ध्या तासातच दिघे साहेबांना मृत घोषित करण्यात आले, असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी तसेच ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलं आहे.
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत ठाणेकरांच्या मनात आजही संभ्रमाचे वातावरण आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. स्वतःची सत्ता, पक्ष वाचवण्यासाठी जी धडपड चालली आहे त्यात रोशनी शिंदेंचा नाहक बळी जाऊ नये.
मीनाक्षी शिंदे पुढे म्हणाल्या, दोन डॉक्टरांनी रोशनी शिंदेला क्लीनचीट देऊनही वारंवार तिला खासगी रुग्णालयात दाखल करत आहेत. तिची प्रकृती ठिक असतानाही तिला गंभीर भासवले जात आहे. गर्भवती नसताना, आहे म्हणून सांगितले जाते. तिला एवढी अॅक्टींग करायला लावली, की तिला बोलताही येत नसल्याचे सांगितले जात आहे. हे का चालले आहे, याचे गूढ कळले नाही.
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, एकीकडे आजारपण दाखवले जात असताना, उद्या एखाद्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारले, तर आम्हाला कळणारसुद्धा नाही, की आतमध्ये काय घडले. म्हणून आम्ही पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात सरकारी डॉक्टरांची टिम पाठवण्याची मागणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यातून सत्य काय ते बाहेर येईल अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.