Wednesday, April 23, 2025
Homeकोकणरायगडपेण, अलिबागला पाणीटंचाईच्या झळा

पेण, अलिबागला पाणीटंचाईच्या झळा

पेण तालुक्यातील दहा हजार नागरिक पिताहेत टँकरचे पाणी

  • सुभाष म्हात्रे

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण आणि अलिबाग तालुक्यातील नागरिकांना सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. पाणी योजनांकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष आणि स्थानिक प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे पेणमधील ९ गावे आणि ३० वाड्यांमधील दहा हजार ५५८ नागरिकांना १४ टँकरने पिण्यासाठी पाणी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून, या पाण्याच्या प्रश्नांतून आमची कधी सुटका होणार असा सवाल स्थानिक विचारत आहेत. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे, सारळ, रेवस या गावांमध्येही तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु तेथे अद्याप टँकर सुरू केलेले नाहीत.

पेणच्या खारेपाट विभागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जवळपास आठ वर्षांपासून ही योजना रखडली आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील तुकाराम वाडी, मसद बुद्रुक, मसद बेडे, बोर्वे, निफाड वाडी, खरबाची वाडी, शिर्की या गावांमधील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. तापमान वाढल्यास पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी साधारणपणे ५५० गावे आणि एक हजार वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाई जाणवत असते. रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या १ हजार ४४४ योजनांमुळे ही पाणीटंचाई कमी होईल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाचा आहे. यासाठी तब्बल ९३८ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम दिसून येत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. जिल्ह्यात प्रथम पेण तालुक्यात पाणीटंचाई सुरू होते. ही टंचाई दूर करण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा योजना अपूर्णच

शहापाडा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी शिर्की चाळ- १, शिर्कीचाळ – २, निफाड ठाकूर वाडी, खरबाची वाडी, कांडणे आदिवासी वाडी, जानवली बेडी, खबसा वाडी, आंबिवली, निगडे आदिवासी वाडी, शेडाची ठाकूर वाडी या गावांना मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत एक कोटी ३६ लाखांची योजना जलजीवनमधून सुरू करण्यात येत आहे. गेल्या वर्षी २५ एप्रिलला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या योजनेचे काम अद्याप अपूर्णच आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही नियोजना अभावी पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. जिल्ह्यात नव्याने कोणतीच धरणे बांधण्यात आलेली नाहीत. तसेच अस्तित्वात असणाऱ्या तलाव, नद्यांमधील गाळही काढलेला नाही. सरकार आणि जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सध्या टंचाई जाणवू लागलेल्या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हेटवणे धरणातून शहापाडा धरणात हे पाणी आणले जाते. तेथून पेणच्या खारेपाट विभागात पाणीपुरवठा केला जातो. परंतु शहापाडा धरणात पाणी कमी येत असल्याने खारेपाटात दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत येथे मीनाताई ठाकरे योजनेतून टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये साठवण टाक्या देण्यात येत आहेत. यातून पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ शकते. – जय वेंगुर्लेकर (कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग)

खारेपाटातील पाणीटंचाईपेक्षा आताची परिस्थिती समाधानकारक आहे. हेटवणे धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी २० तास पंप सुरू आहेत. परंतु ज्या गावांमध्ये पाईपलाईनच टाकलेली नाही, अशा गावांना, वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. जलजीवन मिशनमधून शिर्कीचाळ येथे पाईपलाईन टाकली जात असून, येत्या काही दिवसांत तेथे सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल. – एकनाथ कोठेकर (उपअभियंता, अलिबाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -