Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्ससायबर चोरांची अशीही बनवाबनवी...

सायबर चोरांची अशीही बनवाबनवी…

  • गोलमाल : महेश पांचाळ

आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाचे ट्विटर अकाऊंट होते. खाकी वर्दीतील त्याचा फोटोही त्यांच्या ट्विटरच्या प्रोफाइलवर होता. या अकाऊंटशी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी जोडले गेलेले होते. पाटील यांच्या अकाऊंटवरून वैद्यकीय मदतीसाठी एक मेसेज पाठवण्यात आला होता. ‘एका बाळाचे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे असून त्याच्या उपचारासाठी पैसे पाठवा’ असा तो मेसेज होता. त्या मेसेजमध्ये आजारी बाळाचा फोटो आणि आर्थिक मदत पाठविण्यासाठी फोन पेचा क्यूआर कोडही दिला होता. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर संबंधित क्यूआर कोडवर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैसे पाठविले. काही कामानिमित्त काही अधिकाऱ्यांचे पाटील यांच्याशी मोबाइलवर संवाद झाला, तेव्हा या मदतीची कल्पना मोक्षदा पाटील यांना देण्यात आली. तेव्हा पाटील यांना थोडा धक्का बसला. आपण असे कोणतेही आवाहन ट्विटरवर केले नसताना आपल्या नावाचा कोणी गैरवापर तर करत नाही ना? असा त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांना या बनावट अकाऊंटची माहिती दिली. सायबर पोलिसांच्या तातडीच्या कार्यवाहीनंतर सदर बनावट ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले. सायबर पोलिसांनी या अकाऊंटवरील अनेक मेसेज पडताळून पाहिले. त्यावेळी मदतीचे आवाहन करणारे अनेक मेसेज त्यावर असल्याचे लक्षात आले. मुलीला वैद्यकीय मदतीसाठी पैशांची गरज असून मदत करावी, असे आवाहनही या अकाऊंटवर होते.

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे उकळविण्याचे प्रकार होतात. यामध्ये ऑनलाइन भामट्यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाइन भामट्याने चक्क एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळविण्याचे धाडस केले आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळले, असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दुसरे प्रकरण म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आणि फोटोंचा आधार घेत व्हॉट्सअॅपचा वापर करून अनेक पोलिसांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोराचा शोध सुरू आहे. याप्रकरणीही अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. याबाबत “आम्हाला तक्रार मिळाली असून आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. हा आरोपी पोलीस, रेल्वे किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करतो.” अशी प्राथमिक माहिती पुढे आली असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे सांगतात. तसेच “एखाद्या कर्मचाऱ्याने एकदे गिफ्ट कार्ड खरेदी केले आणि ते त्या नंबरवर पाठवले की, त्याचा वापर फ्रॉड शॉपिंगसाठी केला जातो किंवा त्याचे रोख रकमेत रूपांतर केले जाते.

महाराष्ट्रात अशी १४४ प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोटो वापरून बनावट व्हॉट्सअॅप प्रोफाइल तयार करून आपल्या कनिष्ठांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.”, अशी शिंत्रे माहिती देतात. बऱ्याच वेळा सरकारी खात्यांमध्ये विशेषत: पोलीस विभागात काम करणारे कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी प्रोटोकॉलमुळे त्यांच्या वरिष्ठांशी थेट बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत गैरफायदा उठवला जातो. हा आरोपी त्यांच्या वरिष्ठांच्या नावाने मेसेज करतो. त्यामुळे कर्मचारी आनंदी होतो. मग पुन्हा मेसेज पाठवला जातो. आपण मीटिंगमध्ये आहे आणि खूप व्यस्त असल्यामुळे ते अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाही. साहेबांनी आपल्याकडे काहीतरी मागितले आहे यावरून काही कनिष्ठ कर्मचारी हरखून जातात. वरिष्ठांच्या नजरेत चांगले स्थान निर्माण होईल, असे त्यांना वाटते. त्यातून पाच ते दहा हजार रुपयांचे गिफ्त कार्ड विकत घेऊन ते तातडीने पाठवून दिले जाते. मात्र ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी कार्ड पाठविण्याअगोदर खातरजमा न केल्याने फसवणूक झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येते, असे शिंत्रे यांनी सांगितले. “जर पोलीस कर्मचाऱ्यांना असे मेसेज आल्यास त्यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी, जेणेकरून त्यांच्याकडे करण्यात आलेली मागणी ही खरेच त्या व्यक्तीने केलीय की, फसवणूक आहे, याबाबत माहिती मिळू शकेल” अशा सूचना सायबर पोलिसांनी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

तिसरी घटना म्हणजे काही दिवसांपूर्वी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याद्वारे पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले एवढंच नाही, तर व्हॉट्सअॅपला त्यांचा फोटो डीपी ठेवून एका सायबर चोराने चक्क पोलिसांकडेच पैशाची मागणी केली होती. नंदकुमार ठाकूर यांचे स्वतःचे फेसबुकवर अकाऊंट आहे आणि त्याची प्रोफाइल त्यांनी लॉक केलेली आहे. मात्र त्यांच्या नावाचे दुसरे एक अकाऊंट तयार करून त्यांच्या फोटोचा आणि अकाऊंटचा वापर करून पोलिसांकडेच पैशाची मागणी केली. ही गोष्ट नंदकुमार ठाकूर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर विभागात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

तात्पर्य : गुन्हेगार हा पोलिसांना घाबरतो, असे बोलले जाते; परंतु आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करण्याचे धाडस आता सायबर चोर करू लागले आहेत, ही गंभीर बाब आहे. पोलिसांचा धाक राहिला नाही की, पोलीस सायबर विश्वात मागे आहेत, असे तर या चोरांना वाटत नाही ना?

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -