सब ठेकेदारामार्फत पुरविली जाते सेवा
- प्रमोद जाधव
माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोर्बा रोडवर उपजिल्हा रुग्णालय आहे. हे रुग्णालय १०० खाटांचे असून फक्त माणगाव तालुक्यातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या तालुक्यासह दक्षिण रायगडमधील रुग्ण या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. परंतु, रुग्णालयातील आहार विभागात सावळा गोंधळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. एका पत्रकाराने मागविलेल्या माहिती अधिकारात ही बाब समोर आली.
माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीमध्ये या रुग्णालयातील आहार सेवा राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्था पालघरमार्फत पुरविली जाते. तसेच शासन नियमानुसार मुख्य कंत्राटदार यांनीच ही सेवा पुरवावी असे असून सुद्धा या ठिकाणी सब ठेकेदारामार्फत सेवा पुरविली जात असल्याचे दिसत आहे. तरी देखील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी वर्ग त्याकडे कानाडोळा करीत आहेत. २०१८ पासून पुढे आहार विभागात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी झालेली दिसत नाही. तरी सुद्धा याच कर्मचाऱ्यांकडून आहार सेवा पुरविली जाते. या ठिकाणी अॅडमिट झालेल्या रुग्णांपैकी बरेचसे रुग्ण रुग्णालयातील आहार न घेता घरूनच जेवण (होम डायट) घेऊन येतात. मात्र २०१८ पासून एकही रुग्ण होम डायट नसल्याचे दाखविले गेले असून त्यांना सुद्धा आहार पुरविल्याचे दाखविले आहे. मग त्यांची बिलेसुद्धा रुग्णालयाकडून कंत्राटदाराला देण्यात आली असल्याचे उघड झाले आहे.
तसेच या रुग्णालयात २०१८ पासून लिक्विड डायट, बटरमिल्क डायट, डायबेटीक डायट, हाय प्रोटीन डायट, लहान मुले सी१, सी२, सी३, सी४ असे रुग्ण वर्गीकरण असून या रुग्णांना विशेष आहार सेवा देणे हे कंत्राटदारास बंधनकारक असून २०१८ पासून आजतागायत उपजिल्हा माणगाव रुग्णालयात असे कोणतेही रुग्ण उपलब्ध नसल्याचे आहार सेवेच्या देयकासोबत असलेल्या पत्रकावर दिसत आहे.
रुग्णालयात २०१८ पासून हजारो रुग्णांनी येथे औषधोपचार घेतले असून यात कोणताही विशेष रुग्ण नसल्याची माहीती उपजिल्हा रुग्णालयाकडून माहिती अधिकारात देण्यात आली. तसेच २०१८ पासून या उपजिल्हा रुग्णालयात अपेंडिस, अल्सर, आतडीचे, गर्भपिशवीची शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्ण हा एक दिवस सलाईनवर असतो, तर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी लिक्वीड डाएट असतो. रुग्णालयात या अनेक शस्त्रक्रिया होऊन देखील एकही लिक्वीड डाएट रुग्ण या उपजिल्हा रुग्णालयात नसल्याचे माहिती अधिकारात माहिती देण्यात आली आहे. ही बाब म्हणजे मोठी आश्चर्याची बाब आहे. तसेच २०१८ पासून एकही विशेष रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झालेला नाही, अशी देखील माहिती दिली आहे.
याबाबत येथील वैद्यकीय अधिक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कंत्राटदारामार्फत जमा करण्यात आलेल्या आहार सेवेची २०१८ पासूनची बिले देखील प्रमाणित करण्यात आलेली नाहीत. तरी देखील हे उपजिल्हा रुग्णालय या कंत्राटदारास पाठीशी घालून योग्य आहार सेवा न पुरविता सुद्धा लाखो रुपयांचे देयक देत आहे.