बोईसर (वार्ताहर) : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत सोळा टक्के वाढीसह ८ कोटी ११ लाख रुपयांची वाढ गृहीत धरण्यात आली आहे. २०२२-२३ चा ५१ कोटी ६३ लाख रुपयांचा सुधारित तर २०२३ -२४ चा ५९ कोटी ७४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आरंभीच्या शिलकेसह महसुली जमा रक्कम ५० कोटी ३३ लाख इतकी असून यात मुद्रांक शुल्क अनुदानाचा वाटा सर्वाधिक ५६ टक्के राहणार आहे. तसेच शासनाकडून ३५ कोटी रुपयांची थकबाकी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
सेस फंडाच्या रकमेत पाचपट वाढ झाली असून अंदाजित २ कोटी रुपयांवरून ९ कोटी ३९ लाखांची रक्कम सेसच्या उत्पन्नात झाली असून पुढील वर्षी कायम राहण्याची शक्यता वर्तवली.
जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे येणाऱ्या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सेसचा उत्पन्नात वाढ होणार असल्याची आशा उपाध्यक्षांनी व्यक्त केली.
समाजकल्याण विभाग
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागासाठी १२ टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. ६ कोटी ७७ लाखांच्या तरतुदीपैकी शासन निर्णयानुसार २० टक्के राखीव निधी ३ कोटी ९५ लाख रुपये आणि मागील अनुशेष २ कोटी ७९ लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टाने दलित आणि मागासवर्गीयांसाठी पायाभूत सुविधा आणि वैयक्तीक लाभांच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.