- ओंजळ : पल्लवी अष्टेकर
मानवी मन हे विविध कंगोऱ्यांनी नटलेले असते. त्यामुळे हल्लीच्या युगात मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांच्यासाठी मन हा आव्हानात्मक विषय झाला आहे. मानवी मन हे अनेक पातळ्यांवर काम करीत असते. प्रासंगिक, घटनांवर आधारित, भूतकाळातील अनुभवांवर, स्पर्धात्मक जगातील ताण-तणाव यांचा मनावर विशेष पगडा असतो.
मानसिक आजारांची कारणे वेगवेगळी असू शकतात. या कारणांमध्ये प्रिय व्यक्तीचे निधन, उपेक्षा, मेंदूला इजा किंवा त्यातील दोष, जनुकीय घडण विस्कळीत पडणे, अपघातामुळे दिव्यांगत्व येणे अशा गोष्टींचा समावेश होतो.
या सर्व कारणांचा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करून रुग्णांना (व्यक्तींना) स्वअस्तित्वाचे भान करून देऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याचे काम मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक करतात; परंतु अजूनही म्हणावा तितका उदार दृष्टिकोन मानसिक समस्यांना आपल्या भारत देशात लाभलेला नाही. कधी यासाठी खर्च करायला आर्थिक पाठबळ नसते, ‘कधी मला काय झालंय?’ या हट्टापोटी व्यक्ती अडून राहातो व मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला तयार नसतो. समाजाची भीती किंवा लाज वाटून व्यक्ती त्यांच्याकडे जाण्यास तयार नसते. त्यामानाने परदेशांमध्ये मानसिक समस्या हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे हा सामाजिक दृष्टिकोन प्रबळ आहे.
वृंदा ही आधुनिक काळाचे प्रतिनिधित्व करणारी मुलगी. तिचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्तीच्या टप्प्यावर असलेले. आई गृहिणी! वृदांने ड्रेस डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण करून धाडसाने स्वतःचे बुटिक सुरू केले. वडिलांनी उत्साहाने तिला आर्थिक पाठबळ दिले. सर्वसाधारण कुटुंबातून विवाहासाठी होणारा दबाव वृंदावर देखील पडू लागला. खरं तर आता कुठे वृंदा आपल्या बुटिकच्या व्यवसायात स्थिरस्थावर होत होती; परंतु तिच्या आई-वडिलांना सतत तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. येणारी स्थळे वृंदा वेगवेगळ्या कारणांनी नाकारायची. त्यामुळे घरात सारखे वाद होऊ लागले. तिच्या वयातल्या मैत्रिणी लग्न होऊन संसाराला लागल्या होत्या. वृंदाला वाटायचे लग्न केले म्हणजेच आयुष्यात सर्व काही मिळवले असे नाही. हे ताणतणाव कुटुंबाला झेपेनात तेव्हा कोणा पाहुण्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला त्यांना घ्यायला सांगितला. समुपदेशनाच्या माध्यमातून मानसोपचार तज्ज्ञांनी भरपूर मार्गदर्शनाच्या सहाय्याने त्यांचे कौटुंबिक वातावरण स्थिर केले.
कुटुंबीयांनी देखील न कंटाळता आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे ठरविले. वृंदाला तिच्या वयोगटातील विवाहित मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने बोलायला सांगितले. हळूहळू वृंदाला स्वतःला वाटू लागले की, तिलाही लग्न करून संसार थाटायला हवा. वेळोवेळी तिच्या पालकांनी व तिने मानसोपचार तज्ज्ञांच्या व्हिजिटस केल्या. आता वृंदाचे तिच्याच गावात लग्न झाले व बुटिक सांभाळत तिने आपल्या संसारात लक्ष घातले आहे. आई-वडीलही थोडे ताण-तणावमुक्त होऊन आयुष्याचा आस्वाद घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक यांची गरज वाटत असल्यास त्यांची मदत घेण्यास न लाजणे. समस्याग्रस्त मनाला धडधाकट व सक्षम करायचे असेल तर लाजेची भावना मनात न बाळगता तज्ज्ञांची मदत घ्या. मी व माझी एक मैत्रीण कोल्हापूरजवळील हातकणंगले येथील दवाखाना व त्याच्याशी संलग्न व्यसनमुक्ती केंद्रात तीन-चार वर्षे समुपदेशक म्हणून कार्यरत होतो. तेथील समाज अत्यंत गरीब परिस्थितीतला होता. तिथल्या आजूबाजूच्या शेतात लोक दररोज मजुरी करायचे व पोट भरायचे. असे तिथल्या लोकांचे जीवन होते. बघता बघता बायकांना तंबाखूचे व्यसन व पुरुष मंडळींना दारूचे व्यसन लागले. तिथे दवाखान्यात दर रविवारी आजूबाजूचे लोक उपचाराला यायचे. अशक्तपणा, कुपोषण या त्यांच्या मुख्य तक्रारी असायच्या. खरोखरंच त्यांच्या समस्या पाहून व जीवनाला झुंज देण्याची त्यांची ताकद पाहून आम्ही अचंबित व्हायचो. संस्थेतर्फे आम्हाला आयुर्वेदिक औषधे जसे की, त्रिफळा, अश्वगंधा (चुर्णरूपात) त्यांना द्यायला उपलब्ध करून दिली होती.
“तुम्हाला तंबाखूची तल्लफ आली की, हे चूर्ण थोड्या प्रमाणात तोंडात टाका’’ असे आम्ही त्यांना सांगायचो.
पोस्टर्सच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम त्यांना समजवायचो. किडनी, लिव्हर या अवयवांवर होणारे दुष्परिणाम त्यांना सांगायचो. पुन्हा व्यसनी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांचे किती हाल होतात हे समजावायचो. काही व्यक्तींना ते पटायचे. मग थोड्या काळासाठी का होईना त्यांचे व्यसन कमी व्हायचे. त्यांच्या व्यसनासाठी जबाबदार असणारी कारणे शोधून परिणामकारकरीत्या त्यावर काम करायला लागायचे.
आयुर्वेदिक औषधांनी त्यांची भूक वाढायची. दवाखान्याच्या तळाशी पिठलं-भाकरी केंद्र होतं. त्या काळी दहा रुपयांत दोन भाकरी व पिठलं मिळायचे. ते खाऊन पुन्हा पुढच्या रविवारी लोक समुपदेशनाला येत राहायचे. तात्पुरत्या परिणामांपेक्षा दीर्घकालीन उपाय करण्यावर आम्ही भर दिला.
दररोज दिवसातून एकदा तरी आपण आरशात आपले प्रतिबिंब पाहतो, तसेच दिवसभरात निवांत क्षणी आपण आपल्या मनाच्या आरशात पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नको असलेली, साचून राहिलेली जळमटे दूर केली पाहिजेत व आपल्याच मनाचे स्वच्छ, नितळ प्रतिबिंब पाहून आपल्याला किती प्रसन्नता वाटेल, याचा अनुभव घेऊन पाहा. ध्यानधारणा, सकारात्मक विचार यांचे एक सुंदर आवरण आपल्या मनावर तयार होईल.
आयुष्यातील काही प्रसंग आपल्याला इतके शिकवून जातात की, अशिक्षित लोकांकडूनही आपल्याला जीवन कसे जगायचे, हा धडा मिळतो. पूर्वी आमच्या घरी एक लीला नावाची बाई घरकामाला यायची. ती फरशी आरशासारखी स्वच्छ करायची. मी कौतुकाने तिला म्हणायचे की, ‘लीला ताई, फरशी तुम्ही आरशासारखी लखलखीत केली आहे.’’ ती गोड हसायची.
लीलाचा नवरा अंधश्रद्धेपोटी नरबळी गेला होता. तिच्या पदरात दोन पोरं व म्हातारी सासू! दिवसातून चार-पाच घरी वेगवेगळी कामे करून ती पैसे मिळवायची. कित्येक वर्षात माझी व लीलाची भेट नाही. मी तिचा शांत, प्रसन्न चेहरा आठवायचा प्रयत्न करते व माझ्या मनाच्या आरशात तिचे संयमी शांत, प्रसन्न रूप पाहते. तर आपण सर्वच जण दररोज आपल्या मनाच्या आरशात दिवसातून एकदा तरी डोकावून पाहण्याचा प्रयत्न करूया. सुंदर, तेजस्वी प्रतिबिंब त्यात आपल्याला नक्की दिसेल.