- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
शेकडो वर्षांपूर्वीपासून कोकणभूमीत शिवशंकर या प्रमुख दैवतासोबत देवी पार्वतीचे स्थानसुद्धा अढळ राहिलेले आहे. कोकणभूमीतील देवगड तालुक्यातील गिर्ये गावाजवळचे शिवशंकराचे स्थान म्हणजे श्री देव रामेश्वर. श्री देव रामेश्वर या मूळ मंदिराची स्थापना इ. स.च्या १६व्य शतकात किंवा त्यापूर्वीही झाली असावी. १४व्या शतकात उत्तर भारतात अल्लाउद्दिन खिलजी व महंमद घोरी या सत्ताधीशांनी दक्षिण भारतात व कोकणभूमीत येऊन आपले बस्तान बसवले आणि स्थानिकांना एकसंध ठेवण्याकरिता मंदिराची स्थापना केली, त्यापैकी हे एक असावे असे त्याच्या मांडणी व मंदिरातील कलाकुसरीवरून अनुमान काढता येईल.
१८व्या शतकाच्या पूर्वार्धात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मूळ स्थानाभोवती दगडी गाभारा बांधला असावा. मंदिराच्या चारही दिशेस प्रवेशद्वारे आहेत, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र संभाजी आंग्रे हे येथील आरमाराचे प्रमुख झाले. ते शिवभक्त होते. त्यांचे दुसरे बंधू सखोजी आंग्रे यांच्यासोबतीने श्री देव रामेश्वर मंदिराच्या मूळ गाभाऱ्यापुढे कलाकुसरीने मढवलेले लाकडी खांबाचे सुंदर मंडप उभारले. सभोवती प्रदक्षिणा मार्ग बांधून मंदिर बंदिस्त केले. तसेच मंदिराभोवती फरसबंदी प्रांगण करून पश्चिम आणि दक्षिण दिशेला प्रवेशद्वारे बांधली. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतीवर व मंदिराच्या तिन्ही दिशेच्या भिंतीवर सुरेख चित्रे रेखाटली आहेत. त्यातील प्रसंग पौराणिक काळातील असून त्यांचे अलंकार, पोशाख, आयुधे १८व्या शतकात वापरात असलेल्या नमुन्याप्रमाणे आढळतात. मंदिराच्या गाभाऱ्यातील इतर खांबांवर कोरीव काम केलेले आहे. कोणत्याही प्रकारचे आधुनिकीकरण दिसून येणार नाही.
या मंदिराचा आणि तेथूनच दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ८०० वर्षे आयुष्यमान असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याच्या आणि ऐतिहासिक घटनांचा अगदी जवळचा संबंध आहे. संभाजी आंग्रे यांनी रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक लोकोपयोगी कामे केली. पण ते अल्पायुषी ठरले. त्यांचे निधन जानेवारी १७४२ साली झाले. त्यांची समाधी याच मंदिराच्या दक्षिण दरवाजाशेजारी सुस्थित अवस्थेत आहे. इ. स. १७६३ साली श्रीमंत माधवराव पेशवे यांनी कोकण किनारपट्टीवर आपली हुकूमत ठेवण्यासाठी सरदार आनंदराव धुळप यांना ‘सुभेदार सिबत आरमार’ हा हुद्दा बहाल केला. धुळपांनी आपले आरमार उभारण्यास प्रारंभ केला. भल्या मोठ्या लढाऊ जहाजांची बांधणी केली. त्यांच्या सोबतीला ३००० सैनिक, ३०० तोफा होत्या. ५ एप्रिल १७८३ रोजी रत्नागिरीच्या किनाऱ्यावर इंग्रजांशी झालेल्या युद्धात त्यांचा पाडाव करून सर्व सैन्य व जहाजे पकडून विजयदुर्ग बंदरात जेरबंद केली. अशाच एका फुटलेल्या जहाजावरील भली मोठी घंटा त्यांनी श्री देव रामेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगली. जिंकलेल्या संतान नामक जहाजावरील भव्य अशी उंचीची डोल काठी मंदिराच्या समोरील पठारावरील प्रवेशद्वारासमोर शौर्याचे प्रतीक म्हणून रोवली आहे. श्रीमंत पेशवे यांनी विजयदुर्ग प्रांताचे मुलकी सुभेदार म्हणून गंगाधरपंत भानू यांची नेमणूक केली होती. त्यांनी व सरदार आनंदराव धुळप या उभयतांनी श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात बरीच कामे केली. मंदिराकडे जाण्यासाठी अवघड वाट होती. पूर्वेकडील डोंगर फोडून त्यात पायऱ्यांची वाट तयार केली व प्रवेशद्वारसुद्धा बांधले. हे मंदिर गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग गावांच्या सीमारेषेवर आहे. गिर्ये गावाच्या पठारावर आल्यावर मंदिर दिसत नाही. डोल काठीचे दर्शन प्रथम घडते. तेथून प्रवेशद्वार पार करून कोरलेल्या पायऱ्यांची घाटी उतरताना मंदिर दृष्टीस पडते. खालील प्रवेशद्वारावर घंटा टांगलेली आहे. मंदिरात पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती, नंदी आणि देवाचे स्थान आहे. कोरलेले खांब व सभामंडप, तेथील चित्रकारी लक्ष वेधून घेतात. मंदिराबाहेरील भिंतीवरील चित्रे आजमितीस तरी सुस्थितीत आहेत. दक्षिण द्वाराबाहेरील परिसरात समाधी व इतर देवस्थाने आहेत.
आजूबाजूच्या परिसर नानाविध झाडांनी बहरलेला आहे. त्यामुळे प्रसन्नता वाटते. मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, होळी इ. उत्सव होतात. विजयादशमीला विजयदुर्ग येथील धुळप वाड्याहून धुळपांचे वंशज आणि शेकडो नातेवाईक मिरवणुकीने सोने घेऊन रामेश्वराला भेट देण्यासाठी जातात. भेट दिल्यानंतरच चोहोकडील गावांमधून सोने लुटीचा कार्यक्रम सुरू होतो. या प्रथेत आजपर्यंत खंड पडलेला नाही. कोकणातील काही ऐतिहासिक वास्तुवारसा लाभलेली अनेक मंदिरे जीर्णोद्धार संकल्पनेच्या अज्ञानापोटी या नावीन्याच्या हौसेपोटी नष्टप्राय झालेली आढळतात, पण श्री देव रामेश्वराचे गिर्ये येथील मंदिर त्याला अपवाद आहे, तर तो एक अमूल्य ऐतिहासिक ठेवाही आहे आणि सर्वांनी रामेश्वराचे दर्शन घेतले पाहिजे. येथे जाण्यासाठी मालवण, कणकवली वा रत्नागिरी येथून थेट एस.टी. वाहतूक आहे. येथून जवळच इतिहासकालीन आरमारी गोदी व विजयदुर्ग किल्ला, सरदार धुळपांचा वाडा आणि सागर किनारा आहे. येथे जेवण, निवासाची चांगली व्यवस्था असल्यामुळे रामेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर श्रद्धा, संस्कृती, मनोरंजन यांचा मनसोक्त आनंद घेता येईल.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)