मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेला जोरदार सुरूवात झाली असून हजारोंच्या संख्येने शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पहायला मिळतंय.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजपची ‘आशीर्वाद यात्रा’ राज्यात सुरु झालीय. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी तसेच ठाकरे गटाच्या आजवरच्या आरोपांना शिंदे गटाकडून उत्तर देण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना-भाजपचे बडे बडे नेते देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार राम कदम, खासदार मनोज कोटक, मुलुंडचे आमदार मिहिर चंद्रकांत कोटेचा, घाटकोपरचे आमदार पराग शाह यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत. या यात्रेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. यावेळी माध्यमाशी बोलताना आशिष शेलार यांनी “भाजप आणि शिवसेना, सोबतच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आमच्याबरोबर आहे याचा आनंद आहेच, जनतेलाही आहे. जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे.” असं म्हटलं आहे.