कल्याण : अमृत योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत अमृत मिशन योजनेअंतर्गत सुरू आहे. ही योजना डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष गाठण्यासाठी योजनेला गतिमानता आणणे व योजनेतील अडथळे दूर करणे तसेच प्रत्यक्ष कामाचा वेग वाढविणे गरजेचे आहे.
यासाठी महापालिका आयुक्तांनी आज या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गोळवली, दावडी, कोळे, काटई ,संदप, सागाव येथील जलकुंभांची व टॅपिंग एकच्या साठी जोडणीसाठी सुरू असलेल्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनच्या कामाची ठेकेदार, प्रतिनिधी, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
तसेच आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून कामाच्या प्रगतीचा बारचार्ट घेऊन त्याप्रमाणे दर दहा दिवसांनी आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येईल व प्रगती किती झाली याची पाहणी करण्यात येईल अशा सूचना दिल्या.
या पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे, अमृत योजनेचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी उपस्थित होते.