- मोनिश गायकवाड
भिवंडी : कोट्यवधी रुपये खर्च करून स्वच्छ भारत अभियान राबवले जात असतानाच या स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजल्याचे भिवंडी परिसरात दिसून येत आहे.
भिवंडी शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. अनेक गल्ली बोळातही कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील स्वच्छता होत नसून स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. तर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेकडून विविध कार्यक्रम राबविले जातात. परंतु त्याच भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेली स्वच्छतागृह सुस्थितीत ठेवण्याकडे पालिका प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनपाच्या दगडी शाळा येथील शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शाळा इमारतीमध्ये शाळा क्रमांक १ भरविली जाते. या इमारतीमध्ये असलेल्या स्वच्छतागृहाची पूर्णतः दुर्दशा झाली आहे. गलिच्छ व तुटके शौचालय, सडके पत्र्याचे गंजलेले दरवाजे आणि दुर्गंधी पसरलेल्या व कित्येक दिवसांपासून स्वच्छता होत नसलेल्या स्वच्छतागृहाचा वापर येथील विद्यार्थ्यांना नाक मुठीत धरून करावा लागत आहे.
ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शहराध्यक्ष जय नाईक, उपजिल्हा अध्यक्ष योगेश धुळे, जिल्हा सचिव हर्शल भोईर, विभाग अध्यक्ष कुणाल अहिरे, कायदेशीर सल्लागार अॅड सुनिल देवरे यांच्या शिष्टमंडळासह पालिका शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी थोरात यांची भेट घेऊन निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
येत्या आठ दिवसात या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता न झाल्यास विद्यार्थ्यांना पालिका मुख्यालयाच्या दालनात स्वच्छतागृहासाठी घेऊन येऊ, असा इशारा परेश चौधरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.