मुंबई : प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना डॉ कनक वाई रेले यांचे बुधवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती यतिंद्र रेले, मुलगा राहुल आणि सून उमा आणि नातवंडे असा परिवार आहे.
आठवडाभरापासून आजारी असलेल्या रेले यांना उपनगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
वयाच्या सातव्या वर्षी नृत्याची सुरुवात करणाऱ्या रेले यांनी मुंबई विद्यापीठातून नृत्य विषयात डॉक्टरेट केले होते. तसेच त्यांनी मुंबई आणि इंग्लंडमध्ये वकील म्हणूनही काम केले होते.
सुमारे आठ दशकांच्या त्यांच्या प्रदीर्घ आणि विलक्षण नृत्य कारकिर्दीत त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान, एम.एस. सुब्बुलक्ष्मी पुरस्कार आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.