Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीपेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात, तीन ठार; तर चार गंभीर जखमी

पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात, तीन ठार; तर चार गंभीर जखमी

पेण: पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे आज सायंकाळी ट्रक आणि इको कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक बराच काळ खंडित झाली होती. अपघातातील सर्व मयत आणि जखमी हे कोल्हापूरला बाळुमामाच्या यात्रेसाठी इको कारने जात होते.

या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, इको कारमधून भाविक बाळूमामाच्या यात्रेसाठी कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते. तर ट्रक खोपोलीहून पेणकडे येत होता. पेण पूर्व विभागातील वाक्रुळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये इको कार मधून प्रवास करणारे चालक नागेश विक्रम दिंडे (वय-२७), प्राजक्ता नागेश दिंडे (वय-२५) आणि विक्रम गोविंदराव दिंडे (वय-५०) हे जागीच ठार झाले. तर याच कार मधील गजानन चंदन वडगावकर (वय-१३), विकी विठ्ठल श्रीरामे (वय-१५), मीनाक्षी विक्रम दिंडे ( वय-२२), कविता विक्रम दिंडे (वय-४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी आणि स्थानिक युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तर कल्पेश ठाकूर यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून जखमींना पेणमधील सरकारी रुग्णालय, म्हात्रे रुग्णालय आणि नंतर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात तातडीने दाखल केले. कल्पेश यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले. दरम्यान, वाक्रुळ येथे राहणारे माजी आमदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.

सदर अपघाताची नोंद पेण पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत. या अपघातामुळे पेण-खोपोली मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक आपटा-रसायनी-पनवेल मार्गे वळविण्यात आली होती.

अपघातग्रस्त परिवार मुळचा कोल्हापूरचा

या अपघातातील दिंडे परिवार हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. दरवर्षी ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळुमामाच्या यात्रेसाठी जात असतात. यंदाही यात्रेसाठी निघाले असतानाच त्यांच्या परिवारावर हे मोठा संकट कोसळे. अपघाताचे वृत्त पेण फणसडोंगरी परिसरात पोहोचताच दिंडे परिवाराशी संबंधितांनी शोक प्रकट केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -