Tuesday, April 29, 2025
Homeक्रीडाखेलो इंडिया : महाराष्ट्राने १६१ पदकांची कमाई करत पटकावले अव्वल स्थान

खेलो इंडिया : महाराष्ट्राने १६१ पदकांची कमाई करत पटकावले अव्वल स्थान

भोपाळ (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वातही सर्वसाधारण विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने जलतरणात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राने स्पर्धेत ५६ सुवर्ण, ५५ रौप्य, ५० कांस्य अशी एकूण १६१ पदके मिळविली. हरियाणा (४१ सुवर्ण, ३२ रौप्य, ५५कांस्य) अशा १२८ पदकांसह दुसऱ्या, तर यजमान मध्य प्रदेश (३३ सुवर्ण, ३० रौप्य, २७ कांस्य) ९६ पदकांसह तिसऱ्या स्थानी पोहोचले. जलतरणात महाराष्ट्राने मुलांच्या विभागात सांघिक विजेतेपद, तर मुलींच्या विभागात सांघिक उपविजेतेपद मिळविले.

अखेरच्या दिवशी धृती अग्रवालने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक मिळविले. तिने २ मिनिटे २८.६७ सेकंद अशी वेळ नोंदविली. अपेक्षाने सुवर्णपदकांचा षटकार लगावताना ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत ३३.९२ सेकंदांत जिंकली. मुलांच्या ५० मीटर फ्री-स्टाईल प्रकारात जयवीर मोटवानीने २४.३२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळविले. अर्जुनवीर गुप्ता हा महाराष्ट्राचाच खेळाडू रौप्यपदकाचा मानकरी ठरला. अखेरच्या रिले शर्यतीत ऋषभ दास, अर्जुनवीर गुपर्ता, शुभंकर पत्की, वेदांत माधवन यांनी ४ बाय १०० मीटर फ्री-स्टाईल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राच्या चमूने ३ मिनिटे ३७.६५ सेकंद वेळ दिली.

यापूर्वी २०१९ पुणे आणि २०२० आसाम येथेही महाराष्ट्र विजेता ठरला होता. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची कमाई केली. कुस्तीत नरसिंग पाटील हा ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -