Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाज९६वे मराठी साहित्य संमेलन

९६वे मराठी साहित्य संमेलन

‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.’’

सुरेश भट्ट यांच्या कवितेच्या ओळी परिसरात निनादत होत्या. गांधी आणि विनोबांची वर्धा नगरी, अनेक मान्यवर साहित्यिकांनी दुमदुमली होती. संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आणि इतर पाहुणे यांना ऐकण्यासाठी गर्दी होत होती. दुरून कवितेच्या ओळी, गझलच्या ओळी ऐकू येत होत्या. कवी कट्टा फुलला होता. एकूणच उत्साह पाहता हा उत्सव मराठी प्रेमींचा होता. दुरून, अगदी गावातून आलेल्या मराठी माणसाचा होता. प्रकाशक कवितेचे पुस्तक छापत नाही, कारण कवितेची पुस्तकं विकली जात नाही. म्हणून काही कोणी कविता करायचे थांबत नाही ना! संमेलनात फिरताना जाणवत होती ती काविता सादर करण्याची ऊर्मी, तग मग…

डॉ. अभय बंग, भानू काळे यांच्यासारख्या मान्यवरांना ऐकून कान तृप्त झाले, मन सुखावले; परंतु साहित्याच्या ओढीने आलेली विलक्षण साधी माणसं भेटली, ओळखी झाल्या. व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर ह्यांनी काहीही न बोलता रेषांच्या मार्फत सहित्यकांचे स्वभाव दर्शन घडवले. सुप्रसिद्ध कवयित्री प्रतिभा सराफ ह्यांची अस्तित्व ही कविता :

अस्तित्व
अचानक वीज जाते
तेव्हा सहज वावरते बाई,
त्या काळोखात!
तिला माहीत असते,
घरात कुठे आहे,
कुठे घालावा हात नेमकेपणी
मेणबत्ती आणि काडेपेटीसाठी.
ती धडपडत नाही,
शोधताना… लावताना मेणबत्ती.
घर उजळून जातं क्षणार्धात
आणि…
घरातल्या प्रत्येक वस्तूचं
अस्तित्व जाणवू लागतं.
बाईचे अस्तित्व मात्र
जाणवत नाही,
अंधार झाल्यावरही…
नि उजेड आल्यावरही!

प्रतिभा सराफ यांची थोडक्यात खूप काही सांगणारी कविता आठवणीत राहिली. खानदेशी लेवागणबोलीतील पुष्पा कोल्हे यांनी खानदेशकन्या बहिणाबाईंच्या जीवनावरील…

‘माह्यी माय बहिनाई’
माह्यी माय बहिनाई
जशी फुलांतली जाई
गंध तिचा परिमोये

सर्व्या जगामंधी बाई… कविता रात्री साडेअकरानंतर ही उत्साहाने सादर केली… दोन मोठाल्या बॅगा भरून पुस्तकं विकत घेणारे विरारचे बालरोगतज्ज्ञ डॉ. जोशी भेटले. डॉक्टर दरवर्षी नेमाने पंढरीच्या वारीला जावे तसे मराठी साहित्य संमेलनासाठी जातात. सोबत त्यांनी बनवलेली आरोग्य सांभाळण्यासाठी असलेली पुस्तिका सर्वांना मोफत वाटतात. ३५ पुस्तकं प्रकाशित झाली असलेल्या भरती सावंत नावाच्या लेखिका भेटल्या. साहित्य संमेलन केवळ प्रस्थापित लेखकांचे होतेच; परंतु अशा साध्या माणसांचे देखील होते. पुस्तकांचे स्टॉल्स मात्र हजारो पुस्तकं मांडून वाचकांच्या प्रतीक्षेत होते. वाचक कमी होत चालले आहेत, हे वैषम्य प्रकाशकांनी बोलून दाखवले.

आम्ही पवनार आश्रम पहिला. जिथे ब्रह्मचारी महिला विनोबांच्या साहित्याचे मनन आणि चिंतन करून त्यांच्या शिकवणीप्रमाणे मेहनत करून स्वभिमानाने जगतात. सेवाग्राम इथे चुलीवर शिजवलेली पिठलं-भाकरीचा आस्वाद घेऊन आम्ही सेवाग्राम व बापू कुटीर, तिथली खादीची दुकानं, इतर हाताने बनवलेल्या वस्तू पाहून मन कृतकृत्य झालं. बापू कुटीच्या आवारात कासिन एकाडा नावाचा बुद्ध धर्म प्रचारक भेटला. अनेक दिवस निर्जळी उपास करून शांतपणे त्याचे वाद्य वाजवीत बसलेला हा जपानी अवलिया आशिया खंडात बुद्धाचा प्रचार करण्यासाठी निघालेला आहे. त्याला मनोमन वंदन करून आम्ही निघालो. संध्याकाळ झाली होती. सेवाग्राम आणि बापू कुटीचा परिसर शांततेत बुडाला होता. इथली शांतता विलोभनीय आहे. आवारातील झाडावर हॉर्नबिल पक्ष्यांची जोडी विहार करत होती. जवळ असलेल्या गायींच्या गोठ्यात गायी आत्ममग्न होत्या. गोधुलीची हीच ती रोमांचक वेळ. या वेळेस आपण सुद्धा आत्ममग्न होऊन दिवसभराचे मनात अवलोकन करावे, अशीच ती वेळ. सेवाग्राम एक्स्प्रेस गाठण्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालो. परत येताना अनेक विचार मनात येत होते. डॉ. अभय बंग म्हणाले त्याप्रमाणे महाराष्ट्राला लाभलेले ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हेच खरे भरलेल्या मनाने मार्ग दाखवणारे संत होते. खरंच विनोबांच्या साहित्यांचे आपण सर्वांनी पुन्हा आकलन करायला हवे.

-डॉ. श्वेता चिटणीस

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -