पाश्चिमात्य देशातील एक विद्यार्थी आपली प्राचीन धनुर्विद्या शिकण्यासाठी भारतात आला. ‘गुरुजी, आपण मला धनुर्विद्या शिकवालं का?’ माझे अवलोकन करून शिक! अवलोकन ही क्षमतेची कसोटी असते. गुरुजींनी आपल्या नेमबाजीचे प्रात्यक्षिक त्यास दाखवले. अनेक दिवस सराव करूनही शिष्यास अचूक नेम जमत नव्हता. काही दिवसांनी गुरुजींनी त्यास एक बाण मारून दाखविण्यास सांगितले. त्यानुसार शिष्याने धनुष्यास बाण लावताच गुरुजी म्हणाले, ‘तुझा नेम चुकला’. परत काही दिवसांनी असेच घडले. शेवटी शिष्याने नाद सोडला. घरी जाण्याआधी शेवटचे गुरुजींच्या धनुर्विद्येचे अवलोकन करावे म्हणून थांबला. क्षणार्धात त्याला उत्तर सापडले. लगेच त्यांनी गुरुजींना नमस्कार करून धनुष्यबाण हाती घेतले. गुरुजी म्हणाले, ‘तुझा नेम अचूक आहे.’ आता तू धनुर्विद्येत पारंगत झालास. शिष्यास कळून चुकले, ‘नेम अचूक आहे किंवा नाही हे महत्त्वाचे नसून तणावमुक्त स्थितीत धनुष्यबाण उचलणं हीच खरी धनुर्विद्या’. शिक्षण घेताना, परीक्षेला बसताना ताण नसावा.
१२वीच्या परीक्षेपासून शैक्षणिक परीक्षेचा मोसम सुरू होतो. देशभरातील ९वी ते १२वीच्या विद्यार्थी-पालक-शिक्षक-समाजाला एकत्र आणून त्यांना तणावातून मुक्त करण्यासाठी, परीक्षेची भीती घालविण्यासाठी, पतंप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील चळवळीत ‘परीक्षे पे चर्चा ’ यात स्वतः पंतप्रधान मोदीजींनी साऱ्यांशी संवाद साधला. स्वतःची क्षमता, सामर्थ्य, आवड ओळखून त्यानुसार भविष्य ठरवा. बऱ्याच मुद्द्यावर मार्गदर्शन करताना बोर्डाच्या परीक्षा इतर शालेय परीक्षेप्रमाणेच माना असे सांगितले.
परीक्षा हा जीवनाचा एक भाग आहे. शैक्षणिक परीक्षा हे ओझं नसून आपला आत्मविश्वास वाढवितो. याच परीक्षा आपल्या जीवनाला शिस्त, वेळेचे नियोजन, संयम, नेतृत्व शिकवितात. परीक्षेमुळे नवीन माहिती, स्वतःचे कौशल्य, तसेच कोणता विषय प्रेरित व कोणती गोष्ट निराशा करते, हे समजते. थोडक्यात तो अनुभव आपली ताकद बनते.
जीवनाच्या परीक्षेत आयुष्य खूप मोठे आहे. समाजाच्या दबावाला बळी न पडता, सत्याला सामोरे जा. कॉपी करून किंवा अनुकरण करून आयुष्य घडविता येत नाही. सर्वांनी स्वतःचे कुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य, पालकत्व निभवत, लहान लहान गोष्टीत आनंद घेत स्वतःचा विकास करत पुढे जावे. आयुष्यात स्थिरावण्यासाठी, प्रमोशन्ससाठी परीक्षेची ही धडपड.
प्रवेश परीक्षेची काही वेगळी उदा.
१. चंद्रकांत कुलकर्णी स्वतःसाठी चंद्रलेखात गेले असताना मोहन वाघांनी सांगितलेला स्वतःचा अनुभव – इंडियन एक्स्प्रेमध्ये वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या नोकरीसाठी मुलाखतीला गेलो असताना संपादक म्हणाले, ‘फोटोग्राफरचा नुसता इंटरव्ह्यू घेऊन काय होणार? हा फोटोरोल घे, आज दिवसभर तुला वाटतील ते फोटो काढ आणि उद्या ते मला दाखव.
२. सर सी. व्ही. रमण यांनी भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी एकदा काही मुलांच्या मुलाखती घेतल्या. नोकरीसाठी नाकारला गेलेला एक मुलगा घुटमळताना पाहून, रमण सर रागावले. तेव्हा तो तरुण नम्रतेने म्हणाला, ‘गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून नाही, आपल्या कार्यालयांकडून येण्या-जाण्याचं अधिक मिळालेलं भाडं परत करण्यासाठी मी थांबलो आहे’. रमण यांना सुखद धक्का बसला. ते म्हणाले,’ मित्रा! तुझे कमी असलेले भौतिक ज्ञान प्रयत्नांनी वाढवता येईल, पण तुझा अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षाही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलीकडे काही जीवनमूल्य असतात ते समजून घेणारे रमण, तसेच निवड झाली नसताना पैसे परत करणारा युवकही या जगात आहेत.
३. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिक्षण घेतलेल्या रोहिणी हट्टंगडी तेथील परीक्षेची खासियत सांगतात, तीन तास बसून आम्ही कधीच पेपर लिहिला नाही. खूप विचार करायला लावणाऱ्या आगळ्या-वेगळ्या परीक्षा. प्रत्येक विषयासाठी एक विषय दिल्यावर तुम्हाला काय अभ्यास,चर्चा करायाची ती करून निबंध लिहा. नंतर त्यावर वर्गातील सर्व सहाध्यायी समवेत चर्चा.
४. खेळाडूंनाही सतत स्वतःला सिद्ध करावे लागते. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीचे कर्तृत्व, क्षमता तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेस परीक्षा म्हणतात. परीक्षा स्वतःला सुधारण्याची संधी देते, खरा मित्र कोण ते सांगते. शैक्षणिक परीक्षेत पास-नापास; इतरत्र विजेते आणि पराभूत या शब्दांशी आपण थांबतो; परंतु जीवन ही तीन तासांची परीक्षा नाही. येथे विषयाला मर्यादा नाही. प्रत्येक परीक्षेसाठी गृहपाठ, सराव, रियाजाच्या जोडीला जिद्द, मेहनत हवी. आपले सारे आयुष्य वेगवेगळ्या टप्यावरच्या परीक्षेने व्यापले आहे. अभ्यासक्रमातील मार्कांपेक्षा व्यवहारज्ञान, शहाणपण, निर्णय घेण्याची क्षमता या साऱ्यांना तुम्ही सक्षम आहेत का? हे परीक्षा लक्षात आणून देते. आलेल्या परिस्थितीशी सामना करत शिकणं. परीक्षेची सुरुवात जन्मापासून होते. जन्मलेल्या बाळाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते ते पुढे आयुष्यभर.
जेव्हा वाईट काळ, वेळ येते तेव्हा साधारपणे प्रयत्न करण्याऐवजी ती वाईट वेळ निघून जाण्याची लोक वाट पाहतात. वेगळा विचार करणारे पुढे जातात. धीरूभाई अंबानींच्या आयुष्यातील एक सत्य घटना. धीरूभाई एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असताना अचानक थोड्या अंतरावर जोराच्या वाऱ्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते म्हणून ड्राइव्हर म्हणाला, ‘सर, वादळात अडकण्याऐवजी मागे फिरूया का?’ धीरूभाई म्हणाले, नाही. पुढे काही अंतरावर भयंकर वादळ सुरू झाले तरी धीरूभाई म्हणाले, थांबू नकोस, पुढे चल. आणखीन पुढे ढगांचा कडकडाट, पाऊस सुरू झाला, ‘सर, गाडी सुरक्षित जागी नेऊ का? तू काळजीपूर्वक गाडी चालव’. आणखीन पुढे गेल्यावर ढग विखुरले, सूर्य चमकू लागला. अचानक धीरूभाईंनी गाडी थांबायला सांगितली. गाडीतून उतरत धीरूभाई म्हणाले, “जे पुढे होते ते वादळाच्या भीतीने आता मागे राहिले.’ मित्रानो! जीवनात संकटाशी सामना करीत जो पुढे जातो तोच सिकंदर! म्हणून परीक्षेला कसोटी म्हणतात.
निसर्गात विविधता आहे, तशी माणसांच्या आयुष्यात आहे. प्रत्येकाची विचारप्रणाली, संस्कृती, थोडक्यांत जगणेच वेगळे असते. जेव्हा आपण या समाजात सहभागी होतो तेव्हा या अदृश्य परीक्षा देत पुढे जातो. म्हणूनच परीक्षा हे माणसाला मिळालेलं एक आव्हान आहे.
-मृणालिनी कुलकर्णी