शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये १४ सिनेमांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘गोदावरी’ या मराठी सिनेमाची निवड करण्यात आली आहे. ‘गोदावरी’ हा सिनेमा प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकल्यानंतर ‘गोदावरी’ या सिनेमाने सिनेमागृहातदेखील धुमाकूळ घातला.
सिनेमाचा संवादलेखक प्राजक्त देशमुखने सांगितले, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोदावरी’ सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड होणे ही गोष्ट खूप आनंद देणारी आहे. ‘गोदावरी’ सिनेमाचे शूटिंग कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये नाशिकमध्ये झाले. आता अनेक चित्रपट महोत्सवांत या सिनेमाचे कौतुक होत आहे, ही चांगलीच बाब आहे. अनेक संकटांवर मात करत हा सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे या सिनेमाला मिळालेले यश हे खूप सुखावणारे आहे. नाशिकच्या गोदावरी नदीने मला हा ‘गोदावरी’ सिनेमा दिला आहे. मला माझं शहर एका वेगळ्या पद्धतीने दाखवता आले, लिहिता आले. गोदावरी नदीसोबत माझे एक वेगळे नाते आहे. ते नाते या सिनेमाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर दाखवता आले हे मी भाग्य समजतो’.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रसून जोशी आणि आर. माधवन यांच्या हस्ते ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन आणि जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जितेंद्र जोशी, गौरी नलावडेसह या सिनेमाच्या टीमने या गौरवशाही सोहळ्यात हजेरी लावली होती.
‘गोदावरी’ला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘इफ्फी २०२१’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे, तर ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘गोदावरी’ या सिनेमाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. ‘वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि ‘न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘एशिया पॅसिफिक प्रीमिअर’ही दाखवण्यात आला आहे. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.