Monday, July 22, 2024
Homeरविवार विशेषसामाजिक उद्योजिका ‘वैशाली’

सामाजिक उद्योजिका ‘वैशाली’

बुधवारी आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. १४१ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या नागरिकांचं आर्थिक नियोजन एक स्त्री करते, हा जगात कौतुकाचा विषय होता. सामाजिक जाणीव आणि व्यावहारिक चातुर्य हे गुण असणारी स्त्री कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होते. निर्मला सीतारामन यांनी ते सिद्ध केले आहे. अशीच गुण अंगी असणारी वैशाली एका खासगी बँकेत कर्मचारी म्हणून काम करायची. मात्र आपल्या पतीला सार्थ साथ देत आज ती १००हून अधिक लोकांना आपल्या कंपनीद्वारे रोजगार देत आहे. आपल्या संस्थेद्वारे हजारो लोकांना शासकीय योजनेचे लाभ मिळवून देत आहे. सामाजिक संवेदना जपत आपलं औद्योगिक साम्राज्य उभं करू पाहणारी ही वैशाली म्हणजे ‘व्हीपीपीएस कॉर्पोरेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ची संचालिका वैशाली प्रकाश शिंदे.

वैशालीचा जन्म मुंबईचा. तिचे शालेय शिक्षण मुलुंड विद्यामंदिरमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झाले. आई-वडील आणि ३ बहिणी असे कुटुंब. वैशालीचे बाबा विश्राम कुरणकर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यावेळी त्यांची कंपनी बंद पडली. परिस्थिती खूप हलाखीची होती. आई शिलाई मशीनवर काम करून घर चालवत होती. काही कालांतराने वडिलांनी रिक्षादेखील चालवायला सुरुवात केली. पण मुलीच्या शिक्षणामध्ये कोणतीच कमतरता येऊ दिली नाही. वडील नेहमी त्यांच्या मुलींना म्हणायचे, तुम्ही शिका, पैशाची मुळीच काळजी करू नका. आज तिन्ही मुली छान शिक्षण घेऊन उत्तम नोकरी-व्यवसाय करत आहेत.

वैशाली शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागली. सुरुवातीला १५०० रु. पगाराची नोकरी स्वीकारली. पुढे नोकरी बदलली. आयसीआयसीआय बँकेत चांगल्या पदावर नोकरीस लागली. खूप मेहनत घेऊन बढती देखील मिळवली. याच दरम्यान वैशालीची ओळख प्रकाश शिंदे या तरुणासोबत झाली. प्रकाशची घरची परिस्थिती बेताचीच होती. पण त्याचा स्वभाव आणि जिद्द लाखमोलाची होती. मुळातच प्रकाशला व्यवसाय करण्याची खूप इच्छा होती. काहीतरी व्यवसाय करायचा या हेतूने नोकरी करत असतानाच छोटे-मोठे व्यवसाय केले. अगदी झेंडूची फुलंदेखील विकली. केळी विकण्याचा व्यवसाय केला. अर्थात या सर्व व्यवसायात कुटुंबाची सोबत होती. समाजासाठी काहीतरी करायचे, ही मुळातच प्रकाशची प्रखर इच्छा होती. मुळातच सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या विश्राम कुरणकरांची वैशाली मुलगी असल्याने नवरासुद्धा त्या वाटेने जातोय हे पाहून आनंद झाला.

एकदा वैशालीच्या मुलाचे सरकारी कागदपत्र बनवायचे होते. ते बनविण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, सरकारी कागदपत्रे बनविणे म्हणजे किती कष्ट, या एका संकल्पनेवर निर्मिती झाली ‘प्रणव आधार एनजीओ’ची. याचा उद्देश होता की, कुणालाही सरकारी कागदपत्रे बनविण्यासाठी अधिक मेहनतीची गरज नाही. मग वैशालीने कार्यालय चालू केले. जिथे सर्वांना एका छताखाली सर्व सेवा मिळतील. अर्थात एका मध्यमवर्गीय कुटुंबाला कुठलाही व्यवसाय चालू करणे म्हणजे भरपूर आव्हानाला सामोरे जावे लागते. जसे की, महत्त्वाचा मुद्दा भांडवल. त्यातूनही मार्ग काढून हे दाम्पत्य व्यवसायासाठी उभे राहिले. हे सगळं करत असताना लक्षात आले की, फक्त समाजकार्य करून चालणार नाही. आपलं घर चालणेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग ‘प्रणव आधार एनजीओ’ ही संस्था निर्माण झाली. येथे एकाच छताखाली सर्व सरकारी व निमसरकारी सेवा दिल्या जातात.

जसे म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तसेच एका यशस्वी स्त्रीच्या मागे हात असतो तो एका पुरुषाचा, तिच्या जोडीदाराचा. आज प्रकाशच्या सोबतीने वैशाली उंच झेप घेऊ शकली. कारण त्याने वेळोवेळी चांगल्या-वाईट प्रत्येक प्रसंगात कणखर साथ दिली. मार्गदर्शन दिले. सर्वात महत्त्वाचे वैशाली आणि प्रकाशने २०१८ साली ‘व्हीपीपीएस कॉर्पोरेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना केली. सदर कंपनी टाटा मोटोर्स, हुंदाई आणि बीएमडब्लू यांसारख्या नामवंत कंपनीसोबत गो ग्रीन इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी भारतभर काम करत आहे. भारतात व्हीपीपीएस कंपनीच्या ५ शाखा आहेत. याचे मुख्यालय मुंबईला आहे. आज वैशालीची संस्था आणि कंपनी १०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत आहे. येत्या पाच वर्षांत १००० पेक्षा अधिक लोकांना रोजगार देण्याचे कंपनीचे
उद्दिष्ट आहे.

पूर्वीच्या काळी कर्तबगार पुरुष मोहिमेवर जात त्यावेळेस घरातील स्त्री संपूर्ण घर सांभाळत असे. आज ती घर आणि उद्योगदेखील त्याच तडफेने सांभाळत आहे. म्हणून आधुनिक काळात तिला ‘लेडी बॉस’ संबोधले जाते. व्हीपीपीएस कॉर्पोरेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची संचालिका वैशाली प्रकाश शिंदे या व्याख्येमध्ये चपखल बसतात.

-अर्चना सोंडे

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -