मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांनी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत.
शिवसेनेची दोन शकले झाल्यावर आणि शिंदे गट भाजपासोबत सत्तेत आल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. या दिवशी मोदी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत.
सध्या मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी भाजपा आणि शिंदे गटाने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबईत ठाकरे गटाला डिवचण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने थेट मातोश्रीबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआऊटसोबतच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटआऊट लावले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यावर आता शिंदे गट आणि भाजपाने यावेळी कोणत्याही परिस्थितीत पालिका जिंकायचीच असा निर्धार केला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पालिकेची मुदत संपली होती. यामुळे लवकरच आता निवडणुका होणार आहेत. यामुळे वांद्रे उपनगरातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांचे मोठे कटआउट्स लावण्यात आले आहेत.
“पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि प्रलंबित आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षासाठी ‘अनुकूल खेळपट्टी’ तयार करण्यात मदत होईल,” असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.