Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीआमदार बच्चू कडू यांना दुचाकीने ठोकले, डोक्याला ४ टाके पडले

आमदार बच्चू कडू यांना दुचाकीने ठोकले, डोक्याला ४ टाके पडले

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू हे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

दरम्यान, बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून नेते, आमदारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेले गोरे यांच्यावर अजूनही पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचाही अपघात झाला. त्यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला. धनंजय मुंडे यांच्यावरही सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यानंतर रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत योगेश कदम यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही.

त्यानंतर आज आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला. विशेष म्हणजे बच्चू कडू मंगळवारीच मुंबईहून अमरावतीला आले होते. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -