Tuesday, April 29, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखबिहारमध्ये दारूबंदी केवळ कागदावरच

बिहारमध्ये दारूबंदी केवळ कागदावरच

जबाबदार व्यक्तींनी तसेच राजकीय नेत्यांनी कोणतेही सार्वजनिक विधान करताना सावधगिरी अथवा तारतम्य हे बाळगायलाच हवे. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, असे करून चालणार नाही. कारण तसे करणे अत्यंत बेपर्वाईचे ठरेल आणि त्यातून समाजमनांत गैरसमज निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्याच दारूबंदी असलेल्या बिहार राज्यात घडलेल्या विषारी दारूकांडाबाबत केलेले वक्तव्य हे असंवेदनशील, अक्षम्य आणि तितकेच बेदरकारपणाचे आहे, असेच म्हणावे लागेल. कडक दारूबंदी लागू असलेल्या बिहारच्या सारण येथे विषारी दारू प्राषण केल्याने किमान ४० जणांचा बळी गेला आहे. राज्यात घडलेल्या या भीषण घटनेवरून तेथील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या मुद्द्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विधानसभेत घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नितीशकुमार यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना केलेल्या एका वक्तव्यामुळे त्या राज्यातच नव्हे, तर देशभरात गदारोळ उठला आहे.

‘‘जो बनावट दारू पिणार, तो मरणारच. लोकांनी स्वतःच सावधगिरी बाळगायला हवी. काहीजण चुका करतातच. जो दारू पिणार तो मरणारच’’, असे बेजबाबदार म्हणावे असे उत्तर नितीशकुमार यांनी दिले. नितीशकुमार इथेच थांबले नाहीत ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा बिहारमध्ये दारूबंदी केली नव्हती, त्यावेळीही लोक विषारी दारू पिऊन मरत होते. इतकेच काय तर अन्य राज्यांतही अशा प्रकारच्या घटना घडत होत्या. लोकांनाच आता सावध राहायला हवे. बिहारमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे काही ना काही बनावट विकले जाणारच. बनावट दारू पिऊन लोकांचा मृत्यू झाला. दारू पिणे ही वाईट सवय आहे, दारूचे व्यसन करू नये.’’ नितीशकुमार यांनी टीका करणाऱ्या विरोधकांबाबत संताप व्यक्त केला आहे. ‘‘गरिबांना पकडू नका, जे दारूचा व्यवसाय करतात, अशा लोकांना पकडा’’, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचेही नितीशकुमार म्हणाले. ‘‘दारूबंदी कायद्यामुळे अनेकांचा फायदा झाला आहे. काहींनी तर दारू पिणे सोडून दिले आहे. दारूशी संबंधित कुठलाच व्यवसाय करू नका. गरज वाटली, तर सरकार दुसऱ्या कोणत्या उद्योगासाठी एक लाखांपर्यंतची रक्कम देण्यास तयार आहे’’, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मोठ्या प्रमाणात दारूबळी गेल्यानंतर आता नितीशकुमार सरकारने राज्यातील दारूबंदी धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर बिहार सरकारचा दारूबंदी कायदा म्हणजे केवळ दिखावा आहे, असे म्हणायला हवे व हा कायदाच रद्द करायला हवा. एवढ्या गदारोळानंतरही मुख्यमंत्री नितीशकुमार मात्र दारूबंदी धोरणावर ठाम आहेत. दारूबंदी ही माझी वैयक्तिक इच्छा नव्हती, तर राज्यातील महिलांच्या आक्रोशाला दिलेला हा प्रतिसाद आहे, या शब्दांत त्यांनी आपली बाजू मांडली. विरोधी पक्ष भाजपने दारूबंदी धोरणावरून नितीश सरकारवर जोरदार टीका केली. तसेच संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला.

विषारी दारू प्यायल्यानंतर ज्यांची तब्येत बिघडली, त्यांच्या कुटुंबीयांनी दारूबंदी कायद्याच्या भीतीने ही बाब दडवून ठेवली. त्यांनी कारवाईच्या भीतीने रुग्णालयांत जाऊन उपचार घेणे टाळले. त्यामुळेच दारूबळींची संख्या वाढल्याचे आता स्पष्ट होत आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने सलग दुसऱ्या दिवशी दारूबळींवरून विधानसभेत गोंधळ घालत या प्रश्नाला वाचा फोडली. तसेच बिहारमध्येही महाराष्ट्राप्रमाणे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारप्रमाणे ‘महागठबंधन’ सरकार असून त्याला पाठिंबा देणाऱ्या सीपीआय (एमएल) लिबरेशन पक्षाने विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जोरदार निदर्शने केली आणि दारूबंदी कायद्याच्या कठोर तरतुदींचे पुनरावलोकन करण्यात यावे, अशी मागणी केली. सरकारमधील घटक पक्षानेच दारूबंदी कायद्याच्या फेरविचाराचा मुद्दा उचलल्याने नितीश सरकारपुढचा पेच वाढला आहे.

बिहारमध्ये विधानसभेत काही दिवसांपूर्वी दारूबंदी कायद्याबाबत संशोधन विधेयक मंजूर करून अनेक मोठे बदल करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या देशभर चर्चा होऊ लागली आहे. दारू पिणाऱ्या लोकांना मी भारतीय मानत नाही, असे लोक महापापी आहेत, असे बेलगाम वक्तव्य त्यावेळी नितीशकुमार यांनी केले होते. नितीशकुमार हे नेहमीच दारूबंदी कायद्याचे जोरदार समर्थन करताना दिसतात. या कायद्यात सुधारणा केल्यानंतरही त्यांनी दारूबंदीचे महत्त्व सांगितले आहे. बिहारमध्ये दारूबंदीमुळे सरकारला आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही नितीशकुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दारूची विक्री सुरू होती, तेव्हा ५ हजार कोटी रुपयांचा कर मिळत होता. मात्र दारूबंदी झाल्यामुळे लोकांना इतर अनेक फायदेही झाले आहेत, असे ते म्हणाले. दारूबंदी झाल्यामुळे आधी जे लोक दारू पीत होते, ते लोक आता पालेभाज्या खरेदी करू लागले आहेत. लोकांचे पैसेही वाचत आहेत आणि लोकांच्या आरोग्यातही सुधारणा झाली आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

दारू पिणे हे वाईटच आहे. पण जर दारूबंदी कायद्याचे कठोरपणे पालन केले गेले, तर विषारी दारूबळीसारख्या घटना घडणारच नाहीत. पण जर या कायद्याचे पालन किंवा कायदा लागू करणाऱ्या यंत्रणा, अधिकारी, कर्मचारीवर्ग खरोखरीच प्रमाणिक असेल, तर राज्यात दारूबंदी योग्य तऱ्हेने लागू होईल आणि चोरीछुपे दारू बनविणे व ती विकणे या गोष्टी झाल्याच नसत्या. त्यामुळे गेली अनेक वर्षे बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदी असलेल्या नितीशकुमार यांनी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यायला हवे. अन्यथा ही दारूबंदी केवळ कागदावरच राहील. निष्पाप लोकांचे बळी जात राहतील आणि नितीशकुमारांसारखी बेलगाम, असंवेदनशील अशी वक्तव्ये येतच राहतील. ती दारू पिणाऱ्यांपेक्षाही अधिक घातक म्हणायला हवीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -