Tuesday, April 29, 2025
Homeमहत्वाची बातमीPrakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले, सीमावाद प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी दोषी असल्याने शिवसेनेवरही...

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले, सीमावाद प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी दोषी असल्याने शिवसेनेवरही शिंतोडे उडणार

मुंबई : मुंबईतील महामोर्चातून विरोधकांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न होत असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरे यांना संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली.

‘राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीची तुलना केल्यामुळे जनतेत रोष आहे. तर दुसरीकडे निर्माण झालेला सीमाप्रश्न हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कॅरेक्टर दाखवणारा आहे. कारण महाराष्ट्रातील सीमेवरील अविकसित गावांनी कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याला सर्वस्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच पक्ष जबाबदार आहेत,’ असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच या पक्षांसोबत आंदोलनात सहभागी झाल्याने या सगळ्या प्रकरणाचे शिंतोडे शिवसेनेवरही उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या दोन पक्षांशी राजकीय तडजोड करावी, मात्र त्यांच्यासोबत प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होताना विचार करावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

सध्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ताकदीवरच रस्त्यावर उतरा, असे मी भेटीत उद्धव ठाकरेंना म्हटले होते. मात्र आम्ही सत्तेत एकत्र होतो, त्यामुळे या आंदोलनात काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सामावून घ्यावे लागेल, असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवारांचा आम्हाला कायम विरोध आहे. उद्धव ठाकरे यांनी सामावून घेतले नाही, तर एकटे लढू. सीमावादाचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कॅरेक्टवर ठरतो. महाराष्ट्रातली गावे आंध्र, तेलंगणा, कर्नाटकात जाऊ द्या म्हणत आहेत. सीमावाद प्रकरणात राष्ट्रवादी-काँग्रेस पूर्णपणे दोषी आहे. जेवढ्या लवकर त्यांच्यातून शिवसेना बाहेर येईल, तेवढा त्यांच्यावर ब्लेम येणार नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून एकजुटीने मोर्चेबांधणी सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंबेडकर यांच्या या टीकेला आघाडीकडून कशा प्रकारे उत्तर दिले जाते, हे पाहावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -