मनमाड (वार्ताहर) : एकीकडे वेटिंगमुळे रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याची स्थिती, तर दुसरीकडे याच आरक्षित तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालेगाव येथे अशरफ रशीद खान (३६) या तरुणाला आरक्षित तिकिटाचा काळाबाजार करताना मनमाडच्या वाणिज्य विभागातील पथकाने पकडले. त्याच्याकडून विविध रेल्वे स्थानकांची १६ हजारांची तिकिटे जप्त करण्यात आली.
मालेगाव येथे रेल्वे आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मनमाड येथील रेल्वे वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांना मिळताच या ठकबाजांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. वाणिज्य विभाग अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांना मालेगाव पोस्ट ऑफिसमध्ये अशरफ रशिद खान तिकिटांचा काळाबाजार करताना संशयास्पद आढळून आल्यावर त्याला पकडण्यात आले.
त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने तिकिटाचा काळाबाजार केल्याची कबुली दिली. ही तिकिटे आपण प्रवाशांना अधिक किमतीने विक्री करीत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्याच्याकडे विविध स्थानकांची १६ हजारांची तिकिटे आढळून आली. त्याला ताब्यात घेऊन मनमाडला आणले असता त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ज्या मोठ्या शहरात रेल्वेस्थानक नाही, अशा ठिकाणी रेल्वे प्रशासन आणि भारतीय डाकघर यांच्यातर्फे पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट पॅसेंजर रिझर्वेशन अर्थात पीआरएसची सुविधा उपलब्ध असते. याद्वारे त्या शहरातील लोकांना रेल्वेचे आरक्षित तिकिट काढण्यासाठी मदत होते. मात्र, ही बाब सर्वसामान्यांना माहिती नसते. याचाच गैरफायदा घेऊन काही मंडळी या माध्यमातून तिकिटांचा काळाबाजार करीत असतात.