नाशिक (प्रतिनिधी) : दिवाळी आटोपली आणि फराळाच्या लाडवांचे डबे रिकामे झाले की अनेकांना वेध लागतात ते मेथी आणि डिंकाच्या लाडवांचे. थंडी वाढू लागली की आरोग्यवर्धकतेसाठी हे पौष्टीक लाडू करण्यासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरू होते. मात्र यंदा भाजीपाला, खाद्यतेलांच्या दरवाढीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना सुकामेव्याच्या दरवाढीचीही झळ सोसावी लागत असल्याने हे पौष्टीक लाडूही महाग पडणार आहेत.
यंदा सुकामेव्याच्या दरांत २० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण दरवाढीमागील महत्त्वाचे कारण असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सुकामेवा, डिंक आणि मेथीच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु जशी मागणी वाढू लागली तशी दरांतही वाढ होत आहे. शहरात केवळ किसमिस आणि काजू भारतातून आयात होतात तर इतर सर्व सुकामेवा गल्फ देशांसह सर्वाधिक प्रमाणात अफगाणिस्तानाहून आयात केला जातो. गत वर्षभरापासून अफगाणिस्तानातून होणारी आयात कमी झाली आहे. याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यदेखील सातत्याने घसरत आहे. घटलेली आयात आणि रुपयाचे घसरणारे मूल्य यामुळे स्थानिक बाजारपेठेवर परिणाम दिसून येत असून, सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
गत काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या दरांत वाढ होत आहे. दिवाळीपासून स्थानिक बाजारात खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे साडेतीनशे रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. दिवाळीमुळे मागणीत झालेली वाढ आता कमी झाल्याने पुढील काही दिवसांत खाद्यतेलांच्या दरांत घसरण होण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसाने झोडपल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.आता पाऊस थांबला असला तरी भाजीपाल्याची आवक काही आहे. त्यामुळे कारले, टोमॅटो, दुधी भोपळा, घेवडा या फळभाज्या वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर चढेच आहे. यातही शेवगाची आयात कमी असल्याने त्याचे दर प्रतिकिलो दोनशेपार गेले आहे.
असे दर (प्रती किलो)
काजू : ८४० ते ९०० रु
बदाम : ७०० ते ७५० रु
मनुका : ३०० ते ३२० रु
पिस्ता : १२०० ते १२५० रु
आक्रोड : ७०० ते ८०० रु
खजूर : १४० ते १८० रु
खोबरे : १८० रु
मेथी : १५० रु
डिंक : २४० रु
गुळ : ५५ रु