नाशिक : २० देशांमध्ये दिवाळी फराळाचा सुगंध टपाल विभागाच्या पार्सल सेवेमुळे दरवळला. त्यातून विभागास सुमारे दोन लाख १४ हजारांचा महसूल मिळाला. शहर- जिल्ह्यातील काही हिंदू बांधव नोकरी, शिक्षणनिमित्त विदेशात वास्तव्यास आहे. त्यांना दिवाळी सणासाठी येणे शक्य होत नाही.
अशा बांधवांना दिवाळीच्या फराळास मुकावे लागते. अशा बांधवांच्या कुटुंबीयांकडून टपाल पार्सल सेवा माध्यमातून फराळ त्यांच्यापर्यंत पोचवले जातात. गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे विदेशातील बांधवांना या आनंदापासून मुकावे लागले होते. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने पार्सल सेवादेखील कोलमडली होती. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहे. त्यामुळे टपाल विभागाची पार्सल सेवादेखील पूर्ववत झाली.
यामुळे फराळ विदेशातील बांधवांपर्यंत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला होता. याची संधी साधत यंदा नागरिकांनी टपाल विभागाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान यासह अन्य विविध २० देशांत असलेल्या आपल्या कुटुंबांच्या सदस्यांपर्यंत दिवाळी फराळ पोहचविले. यातून टपाल विभागास सुमारे दोन लाख १४ हजार ७२२ महसूल प्राप्त झाला. यंदा फराळाचे सर्वाधिक पार्सल जपान या ठिकाणी पाठवण्यात आले.
त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत सर्वाधिक पार्सल पाठविण्याचे प्रमाण होते. २० देशात सुमारे ५३ दिवाळी फराळाचे पार्सल गेल्याची माहिती टपाल विभागाकडून देण्यात आली. यामुळे सध्या विदेशात वास्तव्यास असलेल्या ५३ भारतीय बांधवांना दिवाळी फराळ आणि दिवाळीचा आनंद घेता आला.
‘टपाल विभागाच्या माध्यमातून विदेशातील भारतीय बांधवांपर्यंत दिवाळी फराळ रूपात कुटुंबीयांच्या शुभेच्छा पोचविण्याची संधी मिळाली. नागरिकांनी विभागावर विश्वास दर्शवून ही संधी दिली. याचे समाधान वाटते. याच पद्धतीने अन्य सुविधांसाठीही नागरिकांच्या सेवेत राहू.’ – रामसिंग परदेशी, वरिष्ठ पोस्टमास्टर, जीपीओ
देशनिहाय पार्सल : संख्या
जपान १०
ऑस्ट्रेलिया ०८
अमेरिका ०७
रशिया ०३
दुबई ०१
बोष्टबॉड ०२
लंडन ०१
सौदीअरेबिया ०२
न्यूयॉर्क ०३
जर्मनी ०१
हंगेरी ०१
डेन्मार्क ०१
आयर्लंड ०१
कॅनडा ०१
स्वझर्लंड ०१
जॉर्जिया ०१
अमोरी ०१
इजिप्त ०१
अन्य ०५