नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजच्या काळात, अधूनमधून उपवास हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. अनेक डॉक्टर आपल्या रुग्णांना हा आहार नियम पाळण्याचा सल्ला देतात. हे अनेक लोकांसाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे; परंतु याचा महिलांच्या हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार समोर आले आहे.
अधूनमधून उपवास करणे म्हणजेच ‘आयएफ’ ही अशी डाएटिंगची पद्धत आहे, ज्यामध्ये २४ तासांचे दोन भाग केले जातात. या उपवासामुळे जेवणाच्या वेळेवर मर्यादा येतात. कोणीही आपल्या सोयीनुसार त्याचे पालन करू शकतो. ‘काय खावं’ याऐवजी ‘केव्हा’ खावे यावर लक्ष केंद्रित केले जाते. साधारणपणे लोक दररोज १२ ते १६ तास उपवास करतात.
अमेरिकेतल्या इलिनॉय विद्यापीठातले शास्त्रज्ञ लठ्ठपणाचा अभ्यास करत होते. या वेळी त्यांनी अधूनमधून उपवास करण्याबाबत महिलांमध्ये होणारे बदल जाणून घेतले. रजोनिवृत्तीपूर्वी आणि नंतरच्या टप्प्यातल्या महिलांचा अभ्यासात समावेश करण्यात आला. या सर्वजणी लठ्ठपणाला बळी पडल्या होत्या. त्यांना आठ आठवडे अधूनमधून उपवास करण्यास सांगितले होते. त्यानंतर रक्ताचा नमुना घेऊन हार्मोन्स तपासण्यात आले. परिणामांमध्ये आढळून आले की, ‘डीहायड्रोएपियान्ड्रोस्टेरॉन’ (डीएचईए) चे प्रमाण आरोग्यविषयक गुणवत्ता सुधारते. यासंदर्भातली घट १४ टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली.
संशोधनात सहभागी असलेल्या क्रिस्टा वराडी म्हणाल्या की रजोनिवृत्तीनंतर ‘डीएचईए’ कमी होणे ही चिंतेची बाब आहे. वास्तविक, ‘डीएचईए’ हा इस्ट्रोजेनचा प्राथमिक घटक आहे, जो स्त्रियांमधला सर्वात महत्त्वाचा हार्मोन्स आहे. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण अचानक कमी होते. तथापि, अभ्यासात अशा महिलांमध्ये लैंगिक अडचणी किंवा त्वचेतले बदल दिसले नाहीत.