मुंबई : मुंबईतल्या सुप्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात तब्बल १३० वर्षे जुने भुयार सापडले आहे. या भुयाराची लांबी तब्बल २०० मीटर असल्याचे समजते. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर अरुण राठोड पायी जात होते. तेव्हा त्यांना एक झाकण दिसले. ते उघडले असता आत भुयार असल्याचे समोर आले.
जे. जे. रुग्णालयात सापडलेले भुयार डिलिव्हरी वॉर्डपासून ते थेट चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. ऑर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि स्थानिक प्रशासनाला या भुयाराची माहिती कळवण्यात येणार आहे. हे भुयार डी. एम. पेटीट आणि मोटली बाई या इमारतींना जोडते.
मुंबईतले सर जे. जे. रुग्णालय म्हणजेच सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय. या रुग्णालयाची इमारत १७७ वर्षांपू्र्वी बांधली गेली. त्यासाठी जमशेदजी जिजीभॉ यांनी एक लाखाची देणगी दिली. १५ मे १८४५ रोजी या रुग्णालयाचे लोकार्पण झाले.
मुंबईतल्या राजभवनातही २०१६ मध्ये एक ब्रिटीशकालीन भुयार सापडले आहे. हे भुयारही सव्वाशे वर्षे जुने आहे. ते १५००० चौरस फूट आहे. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी यांनी भुयाराच्या पूर्वेस असलेल्या प्रवेशद्वाराची भिंत तोडण्याचे आदेश दिले. तेव्हा भुयारात २० फूट उंचीच्या एकूण १३ खोल्या सापडल्या.