जून ते सप्टेंबर हे पावसाचे चार महिने असतात. या वर्षीचा पावसाळा पाहिला, तर ऑक्टोबरमध्ये जुलैसारखा जोरदार पाऊस पडला. पर्जन्यछायेच्या प्रदेशात कोकणासारखा पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक ठिकाणी हातची पिकं गेली. पीक पद्धतीतल्या बदलाचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला. अशा स्थितीत मान्सूनच्या पावसाचं वर्तन का बदलत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीला तापमान वाढीबरोबरच विविध विकास प्रकल्पांसाठी होणारी अंदाधुंद जंगलतोड, नद्यांमधलं अवैध उत्खनन इत्यादी प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे पावसाळ्यावर परिणाम होतो तसंच मातीची आणि नद्यांची धूप होते. ढगफुटी पूर्वीही होत होती; परंतु तिचं प्रमाण कमी होतं. तशीच ती ठरावीक भागात होत होती. आता पुणे, बंगळूरुसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वत्र ढगफुटी झाली. त्यामुळे नद्या धोकादायक पातळीतून वाहिल्या. आपल्याबरोबर जमिनीही घेऊन गेल्या. माती तयार व्हायला हजारो वर्षं लागतात. या वर्षी मान्सूनच्या काळात मुसळधार पाऊस, पूर, ढगफुटी, वीज पडणं आणि भूस्खलनाने देशाच्या विविध भागांमध्ये कहर केला. देशातले अनेक भाग पावसासाठी तळमळत राहिले, तर अनेक भागांमध्ये आभाळ कोसळत राहिलं. काही ठिकाणी तर ढगफुटीने अनेक बळी घेतले. हा पर्यावरणाच्या असंतुलनाचा परिणाम आहे. विनाशाची तीव्रता वर्षानुवर्षं वाढतच आहे. ऑक्टोबर महिन्यातही अतिवृष्टीमुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आगामी काळात महागाई वाढण्याची भीती आहे. ऑक्टोबरच्या मध्यातही अतिवृष्टीमुळे डेंग्यूसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे. ‘क्लायमेट ट्रेड्स’च्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबरदरम्यान, मान्सून अनेकदा उत्तर प्रदेशातून झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमार्गे सरकतो; परंतु या वर्षी तो गंगेच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करण्याच्या पारंपरिक मार्गाऐवजी उत्तर भारतात दाखल झाला होता. मध्य भारताचा मार्ग त्याने धरला. तो मध्य भारतातून राजस्थानच्या दिशेने सरकला.
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये या वर्षी फारच कमी पाऊस झाला, तर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि इतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. झारखंडमध्ये आताच महिलांवर पाण्यासाठी दाही दिशा करण्याची वेळ आली आहे. एका अहवालानुसार, मान्सूनच्या पॅटर्नमध्ये अलीकडे दुसरा मोठा बदल दिसून आला. या वेळी बंगालच्या उपसागरात बहुतांश ‘सिस्टीम’ तयार झाल्यामुळे सुरुवातीच्या काळात तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पाऊस खूप जास्त होता, तर अरबी समुद्राला लागून असलेल्या किनारी भागात कमी पाऊस झाला. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, मान्सूनमध्ये बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्रीवादळ तयार होतं. त्यामुळे भारतभर मान्सूनचा पाऊस पडतो; मात्र अरबी समुद्रात तयार होणारी प्रणाली बदलल्यामुळे मान्सूनचा मूड बिघडत चालला आहे. पावसाळ्यात महिन्यातले बहुतांश दिवस आता कोरडेच असतात, मग काही दिवसातच इतका पाऊस पडतो की लोकांच्या अडचणी अनेक पटींनी वाढतात.
जागतिक तापमानवाढीमुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या वेळी भारतात मान्सूनची पर्जन्यप्रणाली तयार होत असल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यातही दमदार पाऊस झाला. १९७१ ते २००९ या कालावधीतल्या मान्सूनच्या माघारीच्या आकडेवारीच्या विश्लेषणाच्या आधारे हवामान खात्याने २०२० मध्ये मान्सून माघारीची १७ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती; परंतु आता अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा कालावधी मोठा होत आहे. साधारणपणे, भारतात मान्सून सप्टेंबरच्या मध्यात परतायला सुरुवात करतो. याला ‘मान्सून माघार’ असं म्हणतात. या कालावधीत पाऊस संपल्यानंतर, आर्द्रतेत घट नोंदवली जाते आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागांमध्ये पाऊस हळूहळू कमी होत जातो. वायव्य भारतात मान्सूननंतरचा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संपत असताना हा ट्रेंड ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारणपणे ५ ऑक्टोबरपर्यंत मान्सूनने संपूर्ण भारतातून माघार घेतली पाहिजे; परंतु तसं झालं नाही. पूर्वी मान्सून राजस्थानमध्ये दीड महिना आणि वायव्य राज्यांमध्ये तसंच पूर्व उत्तर प्रदेशमध्ये सुमारे तीन महिने टिकत असे; परंतु आता तो राजस्थानमध्ये दोन महिने आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये सुमारे चार महिने टिकतो.
उत्तर भारतात पावसाळा आता सोळा दिवसांचा झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यंदा मान्सून अनेक ठिकाणी उशिरा दाखल झाला. त्यामुळे देशाच्या पश्चिम भागात सप्टेंबरपर्यंत सक्रिय राहिला आणि या हालचालींमुळे मान्सून माघारीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला. पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते, मान्सूनचा पारंपरिक मार्ग बदलल्यास हवामानावर दूरगामी परिणाम होतील. मानवांपासून प्राण्यांपर्यंत त्याचा परिणाम दिसून येईल. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या मान्सूनच्या आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर, ‘क्लायमेट ट्रेड्स’ अहवालात पश्चिम राजस्थानमध्ये ७८ टक्के, कच्छमध्ये ४२ टक्के, पश्चिम मध्य प्रदेशात ३६ टक्के, मराठवाड्यात २७ टक्के, गुजरातमध्ये २४ टक्के आणि विदर्भात २२ टक्के पाऊस झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४४ टक्के अधिक, बिहारमध्ये ३९, झारखंडमध्ये २७ आणि पश्चिम बंगालमध्ये १८ टक्के कमी पाऊस झाला आहे. विविध अभ्यासांमधून हे सत्य वारंवार समोर येत आहे की, मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जागतिक तापमान आणि पर्यावरणाचा हा गोंधळ. तो असाच सुरू राहिला तर येणाऱ्या काळात अशा दुर्घटना अधिक गंभीर स्वरूप धारण करतील; परंतु निसर्गाने वारंवार गंभीर इशारे देऊनही कोणी धडा घ्यायला तयार नाही.
एकीकडे आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांनी निसर्गाशी छेडछाड सुरू ठेवली असताना, विकसनशील देशांनी कधीच हवामानबदलाची समस्या फारशी गांभीर्याने घेतली नाही. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी विकसित देश प्रयत्न करत आहेत, असंही दिसत नाही. याची जबाबदारी ते केवळ विकसनशील देशांवर फोडत आहेत. आता शहरं, गावं कधीही पाण्याखाली जातात. अशा स्थितीत मान्सूनच्या पावसाचं वर्तन का बदलत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीसाठी हवामानबदलाबरोबरच विविध विकास प्रकल्पांसाठी अंदाधुंद जंगलतोड, नद्यांमधलं अवैध उत्खनन इत्यादी प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे पावसाळ्यावर परिणाम होतो तसंच मातीची आणि नद्यांची धूप होते. हवामानबदलाबाबत ‘नेचर कम्युनिकेशन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, भारताच्या एका भागात हवामानबदलामुळे दुष्काळाचं संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असताना येत्या तीस वर्षांमध्ये देशाच्या मोठ्या भागाला अतिवृष्टीचा सामना करावा लागू शकतो. २०५० पर्यंत उत्तर भारतात दुष्काळाचं संकट अधिक गडद होण्याची आणि देशातल्या अनेक भागांमध्ये १५ ते ३० टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.
या बदलांबद्दल चिंता व्यक्त करताना, संशोधकांनी २१०० पर्यंत देशाच्या मोठ्या भागात ३० टक्के जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. संशोधकांच्या मते, भारताच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे होणारा विध्वंस हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, एके काळी स्थिर मानल्या जाणाऱ्या मान्सून हंगामाच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल दिसत आहे. ही समस्या केवळ भारताची नसली तरी जगभर मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणत आहे.
-भास्कर खंडागळे