मुंबई (वार्ताहर) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे काम सध्या वेगाने सुरू असून या स्थानकांवर प्रवाशांकरिता विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. लहान मुलांच्या स्वच्छतेचा विचार करता मेट्रो-३च्या २६ स्थानकांवरील प्रसाधनगृहात बाळाचे डायपर बदलण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे.
लोकलवरील ताण कमी करण्यासह प्रवाशांना जलद, सोयीचा प्रवास करता यावा याकरिता कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ सोयीस्कर ठरणार आहे. या भुयारी मेट्रो-३च्या २६ स्थानकांवर उभारण्यात येणाऱ्या महिला व पुरुष प्रसाधनगृहात बाळाचे डायपर बदलण्याची सुविधा असणार आहे. या प्रकारची सेवा सुविधा देणारे मेट्रो-३ हे देशातील पहिलेच कॉर्पोरेशन असेल, असा दावाही या सुविधेच्या निमित्ताने करण्यात आला आहे.
यासंदर्भात मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे प्रवक्ते यांनी सांगितले की, “मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रथमच स्थानकातील पुरुषांच्या स्वच्छतागृहात लहान मुलांचे डायपर बदलण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. आतापर्यंत भारतातील कोणत्याही मेट्रो स्थानकावर मुलांच्या डायपर चेजिंगची सुविधा पुरुषांच्या स्वच्छतागृहात नाही. मात्र आपण तो प्रयत्न सुरू करणार आहोत, असे सांगण्यात आले.