Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेकळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी

कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी

ठाणे (प्रतिनिधी) : कळवा येथील मनीषा नगर परिसरात पाहिल्या मजल्यावरील स्लॅब तळमजल्यावरील एका दुकानावर कोसळल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. दरम्यान जखमींवर कळव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कळव्यातील मनीषानगर मधील तरण तलावाजवळ विक्रांत ही ३८ वर्ष जुनी इमारत आहे. सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील राहणारे गणेश धामणे (रूम क्रमांक १०६) यांच्या घराचा स्लॅब अचानक तळ मजल्यावर असलेल्या मालक हसन सलमानी हकीम यांच्या ग्लोबल ब्युटी सलून या दुकानावर कोसळला. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावर राहणारे आयुष जानू धामणे (वय २०) याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर तळ मजल्यावरील सलून मध्ये काम करणारे कर्मचारी कादीर सलमानी (वय १९) याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तर या सलून मध्ये केस कापण्यासाठी आलेला पार्थ पाटकर (वय १६ राहणार, पंचदीप सोसायटी, मनीषा नगर) याच्या डोळ्याला व पाठीला दुखापत झाली आहे. या तिन्ही जखमींना उपचारासाठी कळव्यातील प्रमिला हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्नीशमन दलाचे जवान व कळवा प्रभाग समितीचे कर्मचारी व अभियंता यांनी तातडीने धाव घेत ढिगारा उपसण्याचे काम हाती घेतले. सदर इमारतीत तळ मजल्यावर सहा दुकाने व दोन रूम आहेत. तर पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवासी वास्तव्याला आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने सदर इमारतीतील स्लॅब पडलेल्या व तळ मजल्यावरील सहा दुकाने बंद करण्यात आली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -