नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात राबविलेल्या चार विशेष मोहिमांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२२ साठी केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’ जाहीर केले आहे. विशेष म्हणजे पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील २ आयपीएस अधिकाऱ्यांसह ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर असलम शेख यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांसह संदीप मंडलिक (पोलीस निरीक्षक), वैभव रणखांब (सहाय्यक पोलीस निरीक्षक), रतीराम पोरेती (एपीएसआय), रामसे उईके (हेड कॉन्स्टेबल), ललित राऊत (नाईक), शागीर अहमद शेख (नाईक), प्रशांत बारसागडे (कॉन्टेबल) आणि अमरदीप रामटेक (कॉन्स्टेबल) यांना पदक जाहीर झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या विशेष ऑपरेशन पदकात तेलंगणातील १३, पंजाबमधील १६, दिल्लीतील १९, जम्मू काश्मीर राज्यातील ४ तर महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उच्च दर्जाचे नियोजन आवश्यक असणाऱ्या तसेच देश, राज्ये, केंद्रशासित प्रदेशाच्या आणि समाजातील मोठ्या घटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मोहिमांमधील अधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी २०१८ सालापासून ही पदके प्रदान केली जातात.
दहशतवाद विरोधी मोहिमा, सीमेवरील कारवाई, शस्त्रास्त्र नियंत्रण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि बचाव कार्य अशा क्षेत्रातील विशेष मोहिमांमधील कामगिरीबद्दल ही पदके प्रदान केली जातात. दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी या पदक विजेत्यांची घोषणा केली जाते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान केल्या जाणाऱ्या या पदकांसाठी साधारणपणे एका वर्षात ३ विशेष मोहिमा तर असाधारण परिस्थितीत ५ विशेष मोहिमा विचारात घेतल्या जातात.