मुंबई (प्रतिनिधी) : कोविड संसर्गाचा नवीन उपप्रकार आढळला असून दीपावली सारख्या सण उत्सवाच्या कालावधीत अधिक संख्येने होणाऱ्या भेटीगाठी, कार्यक्रम लक्षात घेता नागरिकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अहवालामध्ये ओमिक्रॉन विषाणूचे नवीन उपप्रकार आढळून आले आहेत. हे नवीन उपप्रकार जुन्या ओमिक्रॉनच्या उपप्रकारांपेक्षा अधिक प्रमाणात संसर्गजन्य ठरू शकतात. ऑक्टोबर २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या आणि जवळ आलेला सणांचा हंगाम लक्षात घेता, नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण सणासुदीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येतात. कार्यक्रम, सोहळे, भेटीगाठी, मेळावे, जत्रा यासह बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या ठिकाणी देखील नागरिक एकत्र आल्यानंतर कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कोविड संसर्गाचा फैलाव होवू नये यादृष्टीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी कोविड प्रतिबंधात्मक वर्तन राखण्याच्या दृष्टीने पुढील खबरदारीच्या उपाययोजना सुचविलेल्या आहेत.
सणासुदीच्या काळात कोविड१९ प्रतिबंध करण्यास योग्य ठरेल, असे वर्तन राखणे महत्त्वाचे आहे. ज्या नागरिकांनी अद्यापही कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल, तर आता लस घेण्याची योग्य वेळ आहे. जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा रोगप्रतिकारक शक्तीला धोका पोहोचणार असेल, तर कोविड लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेतल्यास विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होवू शकते, अशा उपाययोजना सुचवल्या आहेत.